
अहमदाबाद विमानतळावर गांजा तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बँकॉकहून आलेल्या मुंबईतील 41 वर्षीय व्यक्तीला सोमवारी अहमदाबाद विमानतळावर अटक करण्यात आली आहे. इम्रान शेख असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून 8.9 कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रानने कपड्यांमध्ये 8.9 किलो गांजा लपवून ठेवला होता. अहमदाबाद कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या (AIU) अधिकाऱ्यांनी इम्रानला अडवले. या पथकाला सामानातील कपड्यांमध्ये लपवलेल्या 14 हवाबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर हा पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन सुमारे 8.9 किलो असून त्याची किंमत 8.9 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट (NDPS कायदा) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.



























































