
बंगळुरुमधील रस्त्यांवरील रोड रेजच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, एका टेक स्टार्टअपच्या संस्थापकाने या समस्येचा सामना करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवत मार्ग शोधून काढला आहे. वकिलाची मदत घेण्याऐवजी त्याने गुगल एआय चॅटबॉट्स जेमिनीला आपला वकील बनवले, ज्यामुळे इंटरनेटवर मोठी चर्चा रंगली आहे. एआयचा अचूक सल्ला आणि डॅशकॅमच्या पुराव्यामुळे अखेरीस आरोपी बाईकस्वाराने आपली चूक मान्य करत माफी मागितली आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागली.
भारत अग्रीचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ दियालानी यांनी सोशल मीडियावर एक संतापजनक अनुभव शेअर केला आहे. कोरमंगला परिसरात पत्नीसोबत प्रवास करत असताना ते रोड रेजचे बळी ठरले. एका बाईकस्वाराचा गैरसमज झाला की सिद्धार्थ यांच्या गाडीने त्याच्या बाईकला स्पर्श केला. या कारणावरून संतापलेल्या त्या बाईकस्वाराने गाडीचा दरवाजा लाथाडला आणि गाडीच्या मागे आपली बाईक धडकवली. तसेच, भीती निर्माण करण्याच्या हेतूने गाडीसमोर वारंवार अचानक ब्रेक दाबले. अशा प्रसंगी अनेकदा पोलीस ठाण्यात जाण्याचे टाळले जाते, मात्र सिद्धार्थ यांनी वकिलाची मदत न घेता कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी गुगल जेमिनीचा आधार घेतला. एआय चॅटबॉटने कोरमंगला पोलीस ठाण्याच्या संदर्भाने एक अचूक लेखी तक्रार तयार करून दिली आणि पोलिसांकडून पावती घेण्याचा सल्ला दिला. सिद्धार्थ तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली, पण ते पावती घेण्यावर ठाम राहिले. चित्रपटांसारख्या वातावरणात, पोलीस आरोपीचा शोध घेत असताना ते पोलीस ठाण्यात समोसे खात थांबल्याचे त्यांनी मजेशीरपणे नमूद केले.
This is how violently he kicked the side of my car!
Looking at the dent, I was clear I wouldn’t let this one go! https://t.co/o2xHl1e0cI pic.twitter.com/bi8cNrNBaD
— Siddharth Dialani (@siddharth_iitm) September 20, 2026
या संपूर्ण घटनेत गाडीत बसवलेला डॅशकॅम सर्वात मोठा पुरावा ठरला. डॅशकॅमच्या फुटेजमध्ये बाईकचा नंबर स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी डेटाबेसमॅन आरोपीचा नंबर शोधून त्याला ठाण्यात बोलावले. सुरुवातीला आरोपीने खोटी आश्वासने आणि उर्मटपणा दाखवला. मात्र पोलिसांनी डॅशकॅमचा व्हिडिओ दाखवत एफआयआर आणि फौजदारी गुन्ह्याचा बडगा उगारताच त्याची हवा गुल झाली. शेवटी आरोपीने लेखी माफी मागितली आणि गाडीच्या नुकसानीची भरपाई केली. या अनुभवानंतर सिद्धार्थ यांनी मजेशीर शब्दांत लिहिले की, आता जेमिनी त्यांचा वकील आहे. सिद्धार्थ यांची ही सोशल मीडिया पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली असून युजर्स तंत्रज्ञानाच्या या सकारात्मक वापराचे भरभरून कौतुक करत आहेत. हिंदुस्थानी गाड्यांवर आता डॅशकॅम असणे ही केवळ हौस नसून सुरक्षेची मोठी गरज बनल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. एका युजरने म्हटले की, डॅशकॅममुळे एक निरपराध व्यक्ती खोट्या संकटातून बचावला. कायदेशीर प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्यासाठी एआय ज्या प्रकारे मदत करत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.



























































