
राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा मुबलकही नाही. पावसाअभावी पिकांवर मोठा परिणाम होणार असून, येत्या दोन-तीन दिवसांत परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. त्यामुळे प्रशासनाने आता दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन यावर लक्ष पेंद्रित करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज दिले तर सिमेंट रस्ते आणि गटारांच्या कामांना फाटा देऊन पिण्याचे पाणी व जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
प्रत्यक्षात बांधावर जाऊन पीक पंचनामे करा
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक पंचनाम्यांबाबत अत्यंत कडक आणि स्पष्ट सूचना दिल्या. पंचनामे करताना ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी या तिघांनीही सोबत असले पाहिजे. केवळ डिजिटलच नव्हे, तर प्रत्यक्षात बांधावर जाऊन सर्व्हेक्षण झाले पाहिजे. शेतकऱयांना त्यांचे नाव पंचनाम्यात आल्याचा दिलासा मिळाला पाहिजे. यासाठी पंचनाम्याची एक प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी आणि केलेले पंचनामे तातडीने ग्रामसभेपुढे मांडून मंजूर करून घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
शिवकालीन बंधाऱ्यांना प्राधान्य
सिमेंट रस्त्यांऐवजी ‘शिवकालीन बंधारे’ आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक जिह्यातील मृत झालेले व जुने साठवण बंधारे तातडीने जिवंत करावेत आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पुनर्भरण करावे, असे ठरविण्यात आले. यासोबतच रोजगार हमी योजना (ईजीएस) आणि कृषी आधारित कामांवर भर देण्याचे या बैठकीत प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
दुष्काळी भागात आंदोलनाची भीती
दुष्काळी परिस्थितीत लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुष्काळी भागात नागरिकांनी पाण्यासाठी किंवा इतर प्रश्नांसाठी मोर्चे काढल्यास, अधिकाऱयांनी त्यांचे निवेदन स्वतः स्वीकारावे आणि चर्चेतून तातडीने मार्ग काढावा, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समित्यांनी निधीचे वाटप करताना सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामांना फाटा देऊन पिण्याचे पाणी व जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
वीज नियोजनासाठी बैठका
राज्यात सध्या विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी महावितरणच्या अधिकाऱयांसोबत बैठका घेऊन विजेचे योग्य नियोजन करावे, अंगणवाडय़ांना तातडीने वीज कनेक्शन द्यावे आणि अभियंत्यांनी प्रत्यक्ष ग्राऊंडवर उपस्थित राहावे असे महसूल मंत्र्यांनी सांगितले.



























































