‘चुहारा’ बोराच्या वाणातून शेतकऱ्याला समृद्धीची दिशा, राहुरीतील शेतकऱ्याला एकरी 50 हजारांचे उत्पन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेंद्र वाडेकर, राहुरी
राहुरी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीतील ‘चुहारा’ बोराच्या वाणातून हिराचंद तनपुरे या शेतकऱ्याला समृद्धीची नवी दिशा मिळाली आहे. त्यातून त्यांना एकरी 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राज्यव्यापी सेवा संकल्प अभियानातून राहुरी बुद्रूक येथील शेतकरी हिराचंद तनपुरे यांनी डिसेंबर 2023 मध्ये आपल्या 60 गुंठे क्षेत्रात ‘चुहारा’ वाणाच्या बोराची लागवड केली आहे. पहिल्या टप्प्यात गावरान बोराच्या 375 रोपांची खरेदी करून त्यावर चुहारा बोराचे कलम केले. लागवडीदरम्यान दोन झाडात योग्य (10 बाय 20) अंतर ठेवल्याने जून महिन्यात फूलधारणा, तर नोव्हेंबरमध्ये झाडांना फळधारणा झाली. बोराची रोपे, कलम करणे, लागवड, कीटकनाशके फवारणी असा एकरी 50 हजार रुपये खर्च आला. तर एकरी 1 क्विंटल उत्पादन निघाले. त्यातच बोराला 100 रुपये किलो बाजारभाव मिळाल्याने तनपुरे यांना चुहारा बोराच्या फळबाग शेतीतून पहिल्या वर्षी खर्च वजा जाता एकरी 50 हजार रुपये उत्पन्न मिळाले. चुहारा बोराच्या फळबागेचे आयुष्यमान 50 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.

‘चुहारा’ वाण, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2, फुले सुपर बायोमिक्स, फुले बगीसाईड तसेच विद्यापीठाने विकसित केलेले कोरडवाहू फळपिकांचे तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर झाल्याने फळबागेला कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे डॉ. उत्तम कदम, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाचे डॉ. सुभाष गायकवाड, रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे यांनी भेट देऊन पाहणी केली.

चुहारा बोराला मिळतेय विशेष पसंती
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ‘चुहारा’, ‘उमरान’, ‘कडाका’, ‘नरेंद्र बेर-1’ अशा विविध बोरांच्या फळबागा आहेत. यामध्ये ‘चुहारा’ बोराला ग्राहकांची विशेष पसंती आहे. राहुरीतील शेतकऱ्याने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीतील चुहारा बोराची फळबाग लागवड यशस्वी केली आहे.