ज्ञानेश कुमार देशद्रोही! हा फक्त मतावर हल्ला नाही, तर देशाच्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्ञानेश कुमार देशद्रोही असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांना वाचवत आहेत, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असे म्हणाले आहेत. एसआयआर परक्रयेच्या वाड्यावर बोलताना ते म्हणाले की, “हा फक्त मतावर हल्ला नाही, तर देशाच्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा एक व्हिडीओ प्ले केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, “मी ५० वर्षांपासून राजकारण पाहत आहे. प्रत्येक वेळी मी सत्ताविरोधी लाट पाहिली आहे. इंदिराजींनी बांगलादेशची निर्मिती केली. त्याच्या काही वर्षांतच त्यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला. काँग्रेस आणि इतर पक्षांनीही सत्ताविरोधी लाटेचा सामना केला, पण भाजप सलग निवडणुका कशा जिंकत आहे? महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला आहे.”

राहुल गांधी म्हणाले की, “जिथे हुकूमशाही असते, तिथेच सत्ताविरोधी लाट नसते. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाला आहे. मतचोरी हे प्रत्येक हिंदुस्थानींच्या अधिकाराचे हनन आहे. मतचोरीचा अर्थ कायद्याची चोरी असा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची निवड पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. मी या नियुक्तीला विरोध केला होता. सरकारने CEC ला कायद्यापेक्षा वर ठेवले. हिंदुस्थानच्या निवडणूक व्यवस्थेला CEC ने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. आमच्याकडे मतचोरीचे सर्व पुरावे आहेत. येत्या ६ महिन्यांत सर्व पर्दाफाश होईल. दोन निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात भाष्य केले आहे.”

ते म्हणाले की, “मी एका राजकीय कुटुंबातून आलो आहे आणि मी ५० हून अधिक वर्षे एका राजकीय कुटुंबात घालवली आहेत. हिंदुस्थानात सत्ताविरोधी लाट नावाची एक मूलभूत ताकद आहे. ती कोणालाही सोडत नाही. इंदिरा गांधींनी बांगलादेशचे युद्ध जिंकले होते, त्या त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या आणि मग अचानक एक-दोन वर्षांच्या आतच त्यांना जबरदस्त सत्ताविरोधी लाट आणि प्रचंड दबावाचा सामना करावा लागला. हीच गोष्ट एकापाठोपाठ एक अनेक नेत्यांसोबत घडते. काँग्रेस नेत्यांसोबतही असेच घडले, प्रादेशिक पक्षांसोबतही असेच झाले, पण काय माहीत, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या बाबतीत असे कधीच का घडत नाही.”

‘मतचोरीच्या माध्यमातून संविधान संपवण्याचा कट’

राहुल गांधी म्हणाले, ‘हा आपल्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे. आपण समजू शकतो की, एखादी व्यक्ती लोकप्रिय असू शकते, पण आपल्याला हे समजत नाही की, भाजपच्या काळात सत्ताविरोधी लाट कशी गायब होते. सत्ताविरोधी लाट सगळीकडेच असते. आम्ही उत्तरांच्या शोधात होतो. आम्हाला उत्तर मिळाले आहे. मत हा देशाचा पाया आहे. मतांचे रक्षण निवडणूक आयोग करतो आणि यातूनच संविधानाला ताकद मिळते. यातून आपले कायदे बनतात. कायद्यातून आपल्या संस्था विकसित होतात. मत संपवले गेले म्हणजेच संविधान संपवले गेले.’

‘६ महिन्यांत सर्व पर्दाफाश होईल’

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “ज्ञानेश कुमार यांची निवड पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी केली होती. आता दोन निवडणूक आयुक्त सांगत आहेत की, ज्ञानेश कुमार हे मतदान व्यवस्थेतील हानीला जबाबदार आहेत. मतचोरीमुळे कायद्याची चोरी होते. मत गेले म्हणजेच कायदा बनवणारी व्यवस्था गेली. जर मते चोरली गेली असतील आणि खासदार संसदेत बसले असतील, तर ते जो कोणताही कायदा बनवतील, तो चुकीचा असेल. त्यांनी बनवलेले सर्व कायदे बेकायदेशीर असतील. मला कोणतीही शंका नाही की ६ महिन्यांच्या आत हे तुमच्यासमोर स्पष्टपणे येईल. आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही पर्दाफाश करू.”