पंचांग बघत बसू नका, तत्काळ दुष्काळ जाहीर करा! उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या मुद्दय़ावरून आज महायुती सरकारवर तोफ डागली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दुष्काळी दौरे केवळ फोटो कायासाठी आणि काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आले आहेत, पण डबल इंजिन सरकार फक्त वाफा सोडतेय. कोरडय़ा दुष्काळात कोरडी सहानुभूती नको. शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी पंचांग बघत बसू नका, तत्काळ दुष्काळ जाहीर करा आणि दुष्काळाच्या मुद्दय़ावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पुढील आठवडय़ात बोलवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दुष्काळाच्या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासातील सगळ्यात मोठे पॅकेज अशी फुशारकी मारत शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. ज्यांची जमीन पुरामुळे खरवडून गेली आहे त्यांना हेक्टरी साडेतीन लाख रुपये देण्याचे आश्वासन त्यात होते. त्यातली किती मदत प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात पोहोचली याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘‘राज्यात दुष्काळ पडू शकतो असा अंदाज हवामान खाते आणि जागतिक अभ्यास केंद्रांनी मोसमाच्या सुरुवातीलाच वर्तवला होता. ही शक्यता लक्षात घेऊन सरकारने तेव्हापासून काय पावले उचलली,’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ठराविक काळामध्ये पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला दुबार, तिबार पेरणी करावी लागते. आता खरीपाचा हंगाम हातातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज चढले आहे. त्यासंदर्भात बातम्या येताहेत, पण त्याची दाहकता नुसती वाचून कळणार नाही इतकी परिस्थिती भयंकर आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दौऱ्यांचे देखावे कशासाठी?

‘‘मंत्र्यांच्या एका दौऱ्याच्या वेळी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी हे धाराशीवमध्ये सर्व शेतकऱ्यांसोबत उभे होते, त्यांना दोरखंडाने अडवले गेले. मग मंत्री तिकडे कोणाला भेटायला जाताहेत? भाजपच्याच कार्यकर्त्यांना भेटले अशी बातमी आहे. काही दौरे दहा मिनिटांत उरकले गेले. हे दौऱ्याचे देखावे का आणि कशासाठी करताय? कोणाला फसवताय? सरकार एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीवर अवलंबून नसेल तर दुष्काळ का घोषित करत नाही,’’ असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

शेतकऱ्यांची खाती बोगस दाखवून बंद करण्याचा डाव

पीक विमा योजना चालू आहे की बंद आहे हेच कळत नाही. बनावट खाती बंद करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थ्यांची नावे वगळली तसे हे शेतकऱ्यांची खातीच बोगस आहेत असे सांगतील, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. सरकार खाती तपासणार, मग निकष लावणार, मग रडतखडत कर्जमाफी करणार. त्यामुळे नवीन कर्जमाफी मिळायला किती काळ लागेल सांगता येत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार

उद्धव ठाकरे यांनी आपण स्वतः लवकरच दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर मी विदर्भात जाणार आहे. शिवसेनेचे सर्व नेते व पदाधिकारी राज्यभर दुष्काळाची तीव्रता आहे तिथे जातील, तेथील शिवसेनेची मदत केंद्रे व शेतकऱ्यांना भेटी देतील आणि सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतेय की नाही याची दक्षता घेतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्रालयात ‘ड्रॉट्स डॅशबोर्ड’ तयार करून आकडेवारी द्या

दुष्काळ आणि मदतीबाबत पारदर्शक लेखाजोखा मांडण्यासाठी मंत्रालयात ‘ड्रॉट्स डॅशबोर्ड’ तयार करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. या डॅशबोर्डवर प्रत्येक जिल्ह्याची अपडेटेड माहिती असेल. माध्यमांमार्फत ती लोकांपर्यंत पोहोचेल. दुष्काळबाधित तालुके, गावे, शेतकरी, मंजूर मदत, वितरीत मदत, प्रलंबित मदत, पंचनामे, पाणी टंचाई, टँकर संख्या, चारा उपलब्धता हे सर्व आकडे त्या डॅशबोर्डवर आले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बुलेट ट्रेन, शक्तिपीठचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वळवा!

राज्यावर दुष्काळाचे गंभीर संकट आहे. दुष्काळात आपण पाणीपुरवठय़ाची प्राथमिकता जशी बदलतो, त्याचप्रमाणे विकास प्रकल्पांच्या मदतीची प्राथमिकताही आता बदलली पाहिजे. विकासाच्या नावाने राज्यात उधळपट्टी सुरू आहे. बुलेट ट्रेन, शक्तिपीठ महामार्ग हे प्रकल्प केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी आहेत. या प्रकल्पांचा निधी तातडीने दुष्काळग्रस्तांसाठी वळवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, जाहीर करा

‘‘शेतकऱ्यांसाठी शिवसेना सातत्याने आंदोलन करते. नुकतेच ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन केले. आम्ही अनेकदा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आहोत. आम्ही नुसती आगपाखड करत नाही. शेतकऱ्याला किती मदत केली गेली पाहिजे, काय केले गेले पाहिजे, या चांगल्या सूचनाही देतो आणि शेतकऱ्यांना मदतही देऊ इच्छितो,’’ असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘‘आमची कर्जमाफी बँकांचा फायदा करून देणारी नसेल असे मुख्यमंत्री म्हणतात, मग किती शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली. जाहीर केलेले पॅकेज किती शेतकऱ्यांना मिळाले, कर्जमाफी योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याची यादी शिवसेनेला हवी आहे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दुष्काळी दौरे काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का?

दुष्काळग्रस्त भागांमध्ये 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘‘जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने जुळत नाहीत, डोक्यावर कर्ज आहे, सगळीच वाताहात झाली आहे. आज 24 तारीख उजाडली तरी मदतीचा पत्ता नाही. आता दोन-तीन दिवसांत घोषणा करू अशी बातमी आली आहे, परत दोन-तीन दिवस कशाला? मग तुम्ही कॅबिनेट बैठक घेता कशाला? कॅबिनेट बैठकीत होतंय काय? 5 ऑक्टोबरची वाट का पाहताय? दौरे जरूर करा, पण मदत जाहीर होणार नसेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे दुष्काळी दौरे नुसते काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? दौरे करणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना खरोखर शेतकऱ्याच्या दुःखाशी देणेघेणे आहे का?’’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

केंद्र सरकार जर आमदार, खासदार पह्डण्यासाठी मदत करत असेल तर त्यांनी पक्षफोडीचे चाळे थांबवून दुष्काळ  निवारणासाठीही मदत केली पाहिजे. अमित शहांनी इकडे येऊन बसले पाहिजे. मोदींनीही परदेश दौरे आटोपते घेऊन देशाकडे आणि दुष्काळग्रस्त महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे.

शेतकरी आज पूर्णपणे संपलेला आहे. त्याचे पिक जळून खाक झालेले आहे आणि अशा परिस्थितीत सरकार कोणते निकष बघतेय? कोणाची वाट बघतेय? सरकारचे डोळे हेच निकष असले पाहिजेत. सरकारला सगळे कागदावर आल्याशिवाय कळत नाही, का आल्यानंतरसुद्धा सरकारचे मन वळत नाही. नेमके झालेय तरी काय?

शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करा असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळतेय की नाही त्यावर लक्ष ठेवा. शेतकऱ्यांची जमीन किती आहे, त्यांच्या जमिनीचा नीट पंचनामा केला आहे की नाही, त्यांचे किती नुकसान झाले, त्या तुलनेत मदत मिळतेय की नाही, कर्जमाफी मिळतेय की नाही यावर लक्ष ठेवा, असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.

शिवसेनेच्या मागण्या

  • सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, विदर्भात दुष्काळाच्या प्रश्नावर तातडीने कॅबिनेट मीटिंग घ्या.
  • विधिमंडळात जे ठरवले जाईल ती मदत 45 दिवसांच्या आत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.
  • एनडीआरएफच्या मदतीची वाट न पाहता मदत करा.
  • पिण्याच्या पाण्यालाही प्राधान्य दिले पाहिजे. त्याचे नियोजन ठरवले गेले पाहिजे.
  • चारा छावण्या सुरू करा. गोमातेसाठी व बैलांसाठी चाऱ्याची व्यवस्था करा.
  • गेल्या वर्षी शेतकऱ्यांना जाहीर केलेले पॅकेज किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले याची माहिती द्या.
  • आता जी कर्जमाफी करण्यात आली त्याचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला याची यादी द्या.
  • दुष्काळामुळे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होणार. त्यांच्यासाठी काय नियोजन करणार. त्यांना तिथल्या तिथे रोजीरोटीची सोय करा.