शिवनेरीवर मुंबई पोस्टलचा शिक्का, गुड मॉर्निंग आणि विवेक महिला संघही विजेते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या चढाईपासूनच गुणांची चुरस, बचावफळ्यांची कसोटी आणि अखेरच्या क्षणापर्यंत धडधड वाढवणारा थरार. शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या विशेष व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई पोस्टलने पश्चिम रेल्वेला 30-27 असे लोळवत विजेतेपदावर नाव कोरले. शेवटची तीन मिनिटे शिल्लक असेपर्यंत आघाडीवर असलेल्या पश्चिम रेल्वेचा विजय मुंबई पोस्टलने हिसकावून घेतला आणि मैदानावर आपल्या जेतेपदाचे शिक्कामोर्तब केले. तसेच कुमार गटात गुड मार्ंनग स्पोर्ट्स क्लबने तर महिला गटात विवेक संघाने शिवशक्ती क्रीडा मंडळाची शक्ती मोडीत काढली.

सामन्याच्या पहिल्या चढाईपासूनच मुंबई पोस्टल आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली. गुणांसाठी झुंजताना एकाही संघाला सहज आघाडी घेता आली नाही. मध्यंतराला पश्चिम रेल्वेने 12-11 अशी निसटती आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रातही संघर्षाची तीव्रता कायम राहिली. रेल्वेने आघाडीची पकड सोडली नाही, मात्र अखेरच्या तीन मिनिटांत सामन्याचे चित्रच पालटले. रेल्वेवर लोण चढवण्यात पोस्टलने यश मिळवले आणि 2 गुणांची आघाडी घेतली, जी त्यांनी पुढील तीन मिनिटे कायम राखत बाजीही मारली.

निर्णायक क्षणी मुंबई पोस्टलने आक्रमणाची धार वाढवली. रेल्वेच्या बचावफळीवर दबाव निर्माण करत पोस्टलने आघाडी मिळवली आणि त्यानंतर विजयाची पकड अधिक घट्ट केली. अक्षय तावडेच्या आक्रमक चढायांना अक्षय बर्डेच्या प्रभावी पकडींची साथ मिळाली. दुसरीकडे प्रणय राणेच्या चढाया आणि विजयंतच्या पकडींमुळे रेल्वेने शेवटपर्यंत झुंज दिली. कुमार गटात गुड मार्ंनग स्पोर्ट्स क्लबने विजय क्लबचा 33-27 असा सहा गुणांनी पराभव केला. नीलेश मोरेच्या चढाया आणि आदित्य धुमाळच्या पकडींनी विजयात मोलाची भूमिका बजावली. महिला गटात विवेक महिला संघाने शिवशक्ती संघाची झुंज 28-24 अशी मोडीत काढली.