
गृहपाठाची वही आणली नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनिला मारहाण करत मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही घटना शहरातील एका प्रसिद्ध शाळेत 5ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली होती.
गणिताची गृहपाठाची वही शाळेत आणायला विसरली म्हणून तो विषय शिकविणाऱ्या शिक्षिकेने त्या विद्यार्थिनिला हातावर मारले होते. त्या विद्यार्थिनीच्या हातावर मारल्याच्या खुणा पाहिल्यानंतर तिच्या आईने तिला त्याबाबत विचारणा केली. यावेळी त्या विद्यार्थिनीने शाळेत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. संतप्त झालेल्या विद्यार्थिनीच्या आईने शाळेत जाऊन या प्रकाराबाबत जाब विचारला असता हा प्रकार मुख्याध्यापक व संबंधित शिक्षिकेने मिटवल्याचे सांगण्यात आले. मात्र, नंतर त्या शिक्षिकेने विध्यार्थिनीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
जाणीवपूर्वक त्या विद्यार्थिनीला मुलांच्या रांगेत बसवणे , अभ्यास न तपासणे यासारखा त्रास देणे सुरु झाल्याने ती विध्यार्थिनी मानसिक दबावाखाली वागू लागली. इतकेच नव्हे तर तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. आपल्या मुलीचे मानसिक संतुलन ढासळू लागल्याचे आईच्या लक्षात आल्यावर तिच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.































































