भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था अपहार प्रकरणी 45 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संस्थेच्या नावाने लघु उद्योगासाठी घेतलेली जमीन अकृषक करून व बनावट ले आउट करत त्याची परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील खरवंडी कासार येथील भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सभासद अशा एकूण 45 जणांविरोधात सहकार विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रतिष्ठित नागरिक व व्यापाऱ्यांचा समावेश असल्याने खरवंडी कासार परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

या संदर्भात सहकार खात्याचे उपलेखापरीक्षक महेंद्र तुळशीराम घोडके यांनी गुन्हा दाखल केला असून या संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण सहकार विभागाने केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाथर्डीच्या सहायक निबंधक अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती अशी की, भगवानगड औद्योगिक संस्थेची स्थापना 1992 साली झाली होती. या संस्थेने खरवंडी कासार परिसरात संस्थेला लघुउद्योग करण्यासाठी कायम खरेदीने शेतजमीन विकत घेतली होती. लघुद्योग करण्यासाठी ही जमीन अकृषक करून मिळावी असा प्रस्ताव 94 साली संस्थेचे तत्कालीन चेअरमन लिंबाजी नाना खेडकर यांनी महसूल प्रशासनाकडे दाखल केला.

हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर महसूल प्रशासनाने ही 87.50० हेक्टर जमीन बिनशेती करण्यास परवानगी दिली. मात्र ही परवानगी मिळाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी,संचालक व काही सभासदांनी मिळून संस्थेच्या 24 सभासदांकरीता 24 व संस्थेसाठी एक असे एकूण 25 प्लॉट पाडले. त्याचा बनावट ले आऊट करून इतरांना स्वतःच्या फायद्यासाठी विकले. हे करताना संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत संस्थेची फसवणूक केली. संस्थेच्या या व्यवहारांसंदर्भात काही सभासदांनी तक्रारी केल्या. या सर्व व्यवहारांची सहकार खात्याने चौकशी केली असता यामध्ये संस्थेच्या नावाने घेतलेली जमीन संचालक मंडळ,सभासद यांनी स्वतःच्या नावाने करत संस्थेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये प्रतिष्ठित राजकीय नेते,व्यापारी यांचा समावेश आहे.