भरधाव वेगातील स्कॉर्पिओने दूध टाकण्यासाठी जात असलेल्या मोटरसायकलस्वाराला धडक दिल्याची घटना आज पहाटे गोरेगाव परिसरात घडली. या धडकेत मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. नवीन मुकेश वैष्णव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालगृहात केली. तर गाडीचे मालक इकबाल जिवणीला पोलिसांनी अटक केली.
नवीन हा आरे कॉलनीच्या युनिट 8 येथे राहत होता. तो मोटरसायकलवरून दूध टाकण्याचे काम करतो. आज पहाटेच्या सुमारास नवीन हा मोटरसायकलवरून आरे रोड येथून जात होता. तेव्हा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र हे स्कॉर्पिओने आरे रोड येथून जात होते. सुसाट वेगात असलेल्या अल्पवयीन मुलाने मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर त्याची मोटरसायकल विजेच्या पोलला जाऊन धडकली.
हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. स्थानिकांनी नवीनला आणि स्कॉर्पिओमधील चौघांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी नवीनला मृत घोषित केले. तर स्कॉर्पिओमध्ये बसलेल्यावर उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती समजताच वनराई पोलीस घटनास्थळी आले. अपघात प्रकरणी वनराई पोलिसांनी गाडीचे मालक इकबालविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.