
डॉक्टर मारहाणप्रकरणी हायकोर्टाने जामीन स्थगित केल्यानंतर शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याची रवानगी आधारवाडी तुरुंगात झाली. म्हात्रेने जेलची कोठडी टाळण्यासाठी आटापिटा केला तरी रविवारची रात्र मात्र त्याला आधारवाडी जेलच्या जनरल बरॅकमध्ये घालवावी लागली. म्हात्रेच्या घशात पाणीही उतरले नाही की रात्रभर त्याचा डोळ्याला डोळाही लागला नाही. या कुशीवरून त्या कुशीवर तो तळमळत होता. गुर्मीत वावरणाऱ्या म्हात्रेची रात्र पुरती तंतरलेली होती. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे ३ ऑगस्टपर्यंत म्हात्रेचा मुक्काम जेलमध्ये राहणार आहे. त्यामुळे किमान घरून जेवण तरी मिळावे यासाठी त्याच्या कोर्टाकडे अर्जविनंत्या सुरू आहेत.
शास्त्रीनगर रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके, परिचारिका नमिता उबाळे आणि द्रव्या गिरी यांना रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंड कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करीत अमानुष मारहाण केली होती. अटक झालेल्या रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान डॉक्टर हल्लाप्रकरणी ‘आयएमए’ने राज्यव्यापी संप पुकारला. याचवेळी म्हात्रेला मंजूर झालेल्या जामिनाची उच्च न्यायालयाने दखल घेत स्वतःहून स्युओमोटो याचिका दाखल करून घेतली आणि त्याच्या जामिनाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत आधारवाडी जेलमध्ये रवानगी केली.
म्हात्रेला जामीन कसा दिला? हायकोर्टच्या समितीने घेतली माहिती
रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंड कार्यकर्त्यांना कल्याणच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन कसा दिला याविषयी कागदोपत्री तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील एक समिती कल्याण न्यायाल यात शुक्रवारी आली होती. या समितीने स्थानिक न्यायालयाने म्हात्रे प्रकरणी नोंदवलेली निरीक्षणे, कागदपत्रांची तपासणी केली. तसेच काही कागदपत्रे सोबत नेली असल्याचे समजते. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी रमेश म्हात्रे याची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात न घेता गेल्या आठवड्यात जामीन मंजूर केला होता. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे.
महिला आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणातील पाचवी आरोपी साधना करांडे यांना रविवारी अटक केली. त्यांना कल्याण न्यायालयाने रविवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आज पुन्हा सुनावणीसाठी साधना यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एन. पी. वासाडे यांनी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली.


























































