
जामिनासाठी पाच हजार रूपये न दिल्याच्या रागातून दुकानदाराला बेदम मारहाण करीत 1 लाख 88 हजारांची रोकड चोरणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना 16 जुलैला यशोदा मिनी मार्केटमध्ये घडली होती. साईराज राणाप्रताप लोणकर (वय 23) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुणाल राणाप्रताप लोणकर (रा. कोंढवा) याच्यासह इतर साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश लोणकर (वय 34, रा. कोंढवा खुर्द ) यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी साईराज सराईत गुन्हेगार असून त्याला जामिनासाठी पाच हजार रूपये पाहिजे होते. त्यासाठी त्याने 16 जुलैला मंगेश यांच्या दुकानात जाउन पाच हजारांची मागणी केली. मात्र, त्यांनी रक्कम देण्यास नकार दिल्याच्या रागातून साईराजने साथीदारांना बोलावून घेतले. टोळक्याने मंगेशला बेदम मारहाण करीत दुकानातील 57 हजारांच्या साहित्याचे नुकसान केले. त्याशिवाय गल्ल्यातील 1 लाख 88 हजारांची रोकड चोरून नेली. परिसरात आरडाओरड करून दशहत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.
























































