चोरी करून सटकला, टोपीमुळे लटकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कफ परेड येथील एका मोबाईलच्या दुकानात रात्री चोरीची घटना घडली. नशा करून चोर पद्धतशीर दुकानात घुसला आणि 40 हजार किमतीचे मोबाईल घेऊन पसार झाला. चोरी करण्यात तो यशस्वी ठरला, पण स्टाइल म्हणून वापरत असलेल्या त्याच्या ऍण्टीक टोपीमुळे तो लटकला.

धोबीघाट परिसरातील रझक सोसायटीत एम. एस. आर. मोबाईलचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी अंधाऱ्या रात्री दुकानाच्या मागच्या बाजूकडील जाळी काढून चोरटा आत घुसला आणि दहा मोबाईल घेऊन आल्यामार्गे पसार झाला. पण यादरम्यान तो त्याची टोपी दुकानात विसरला. याप्रकरणी दुकानमालकाने तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक संदीप पिसे, विकास पाटील व पथकाने तपास सुरू केला. दुकानात पंचनामा करीत असताना पथकाला ती टोपी मिळाली. ही टोपी आमची नसल्याचे दुकानमालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या टोपीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा त्याच परिसरात राहणारा सागर परमार (19) हा ती टोपी घालून फिरायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली. पण चोरी केल्यापासून सागर गायब झाला होता. घरी परतल्यावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली. त्याने चोरीचे मोबाईल एका गोणपाटात गुंडाळून ते घराच्या पत्र्यावर ठेवले होते. ते मोबाईलदेखील जप्त करण्यात आले.

लाइट दिसली म्हणून घुसलो
कफ परेड येथील रेल्वे अधिकारी क्वार्टर्सबाहेर फुटपाथवर झोपणाऱया मंगेश केळशीकर यालादेखील कफ परेड पोलिसांनी चोरीच्या गुह्यात बेडय़ा ठोकल्या. चौकशीत त्याने सांगितले की, त्या दिवशी रात्री लघुशंकेसाठी जाग आली म्हणून उठलो तर समोर असलेल्या बेरूट हॉटेलची लाइट सुरू असल्याची दिसली. त्यामुळे मागच्या बाजूला असलेल्या दरवाजातून हॉटेलात घुसलो आणि दोन टॅब चोरले. सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून कॅमेरादेखील तोडला, पण तरी तो कॅमेऱयात कैद झाला होता. त्यामुळे मंगेश पकडला गेला. त्याने चोरीचे टॅब उशाखाली ठेवले होते ते जप्त करण्यात आले.