घटनाबाह्य सरकार जातीजातींत भांडणं लावतंय! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कृषिक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र कोलमडलेले असताना सध्याचे घटनाबाह्य सरकार जाती-जातींमध्ये भांडणे लावून दंगली भडकविण्याचे काम करीत आहे. खोटी आश्वासने देणाऱ्या या राजवटीबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष असून, आगामी काळात जनताच या घटनाबाह्य सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.

नवरात्रोत्सवानिमित्त आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असता, त्यांनी पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील विविध भागांतील मंदिरांमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदी यावेळी उपस्थित होते.

ललित पाटील प्रकरणात सर्वप्रथम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेच आवाज उठविला असून, मोर्चादेखील काढला आहे. गृहमंत्री नुसतेच म्हणाले की, आता सर्वांची तोंडं बंद होतील. मात्र, त्यांनी प्रथम ऍक्शन घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

तो जनरल डायर कोण ?

मनोज जरांगे यांनी दिलेल्या 25 तारखेच्या अल्टिमेटमबाबतच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना अद्यापि त्यांनी ठोस आश्वासन दिलेले नाही. मराठा आंदोलनावर लाठीचार्ज, गोळीबार कोणी केला? या प्रकरणाचा जनरल डायर कोण होता? गोळीबार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला की उपमुख्यमंत्र्यांनी दिला याचे उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावे.