आता तरी कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हीच अपेक्षा – आदित्य ठाकरे

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय योग्य असल्याचा निकाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालासोबत सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करून 9 महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देशही दिले. या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं म्हणत किमान आतातरी कश्मीरमध्ये कश्मिरी पंडितांची घरवापसी करण्याची तरतूद सरकारने करावी हीच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट लिहिताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं खूप मनापासून स्वागत करतो. जम्मू आणि कश्मीरला राज्याचा दर्जा परत देण्याचा, त्यासाठी निर्धारित वेळेचे नियोजन आणि निर्देश हे आपल्या देशासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. बराच काळ जम्मू आणि कश्मीरच्या नागरिकांच्या हक्कासाठी कोणीही आवाज उठवला नव्हता, त्यांच्या मतांना किंमत नव्हती. मात्र या निर्णयामुळे त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होण्यासाठी मदतच होणार आहे. त्यामुळे आम्ही आशा करतो की केंद्र सरकारही कश्मिरी पंडितांच्या घरवापसीसाठी योग्य ती पावलं उचलेल आणि निवडणुकीच्या मार्गाने या राज्याच्या भविष्याला आकार देऊ शकेल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.