
मुंबई-महाराष्ट्राच्या ‘विकासाचे मॉडेल’ देशातील सर्व राज्यांत नेणार असल्याचे प्रतिपादन करतानाच यापुढे शिवसेना प्रत्येक राज्यात निवडणुका लढणार असल्याची महत्त्वाकांक्षी घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली. आदित्य ठाकरे यांच्या गोव्यातील झंझावाती प्रचारसभांना तुफान प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगत विरोधकांचा समाचारही घेतला.
भाजपसोबतच्या युतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, आपल्या मित्राला धोका नको, त्यांची मते तुटायला नको. त्यांना मदत म्हणून इतर राज्यांत लढत नव्हतो. पण इतर पक्ष वाढत गेले. शिवसेनेतील काही जण त्यांच्या पक्षात गेले. पुढे मंत्री झाले, खासदार झाले. तरीही आम्ही मैत्री जपायला कुठेही लढलो नव्हतो. आता आमचे अस्तित्व होते त्या ठिकाणी लढायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशात निवडणूक लढत आहोत. बिहार, पश्चिम बंगालमध्ये लढलो. आता मणिपूरमध्ये लढत आहोत. सिल्व्हासामध्ये आमचा खासदार निवडून आला. आज गोव्यात लढत आहोत. यापुढे आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मागील काही काळात आमची भाजपसोबत युती होती. मित्रपक्ष असेल तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला पाहिजे. आपल्या मैत्रीत मित्राला कुठेही धोका नको अशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भावना होती, पण गेल्या पाच वर्षांत भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ आमच्याच नव्हे तर इतरांच्याही. म्हणूनच एनडीएतील मित्रपक्षही भाजपला सोडत गेले, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार उतरवले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या पेडणे, वास्को, साकरी म्हापसा अशा अनेक ठिकाणी प्रचारसभा झाल्या. या प्रचारसभांना तुफान प्रतिसाद मिळाला. त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशनही झाले. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांची भरगच्च पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, खासदार राजन विचारे, आमदार सुनील शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
गोव्यात प्रत्येक गावात शाखा
शिवसेनेसाठी गोव्यात वातावरण तयार झाले आहे. गोव्यातील जनतेच्या मनात शिवसेना आधीपासून होती, पण आता निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी पोहोचले आहे. गोव्यात प्रत्येक गावात शाखा सुरू करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढवत आहोत, यापूर्वीही लढवली आहे. गोवा व प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार. लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा निवडणुका लढवणार. कारण महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवायला लागली आहे.
शिवसेनेचे वाघ
- गोव्याच्या राजकारणातील घोडेबाजाराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो, असे ठणकावून सांगितले.
- शिवसेनेने मैत्री खुलेपणाने जपली. जे काही बोलायचे होते ते खुलेपणाने सांगितले आहे आणि साफ व स्वच्छ मनाने आम्ही उत्पल पर्रिकरांना पाठिंबा दिला आहे. कुठेही छुप्या बैठका झालेल्या नाहीत.
- गोव्यात नवीन विमानतळ, हॉटेल येत आहेत. पण यामध्ये स्थानिकांना न्याय का मिळाला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात स्थानीय लोकाधिकार समितीमार्फत उमेदवारांना प्रशिक्षण देऊन नोकऱया दिल्या, रोजगार उपलब्ध करून दिला, असे त्यांनी सांगितले.
- गोव्यातील परिस्थितीला जबाबदार कोण याकडे बोट दाखवण्याची ही वेळ नाही आणि ती आमची स्टाइलही नाही. आम्ही कोणावर बोट दाखवण्यासाठी जात नाही. आम्ही काम करण्यासाठी आलो आहोत.
फुटबॉल टीम आणि गोल
गोव्यात शिवसेनेचे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचा धागा पकडत ते म्हणाले की, आमची 11 जणांची फुटबॉल टीम आहे आणि त्यांना गोल मारायचा आहे.
भाजपच्या सत्ताकाळात विकास नक्की कोणाचा?
गेली दहा वर्षे गोव्यात भाजपची सत्ता आहे. केंद्रात तर सात वर्षे बहुमताचे सरकार आहे, पण तरीही गोव्याचा शाश्वत विकास होऊ शकला नाही. अजूनही वीज–पाण्याचा प्रश्न आहे. गोव्यातल्या दुर्गम भागात असा प्रश्न असेल तर समजू शकतो, पण महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रश्न असतील तर मग नक्की कोणाचा विकास झाला, लोकांचा विकास झाला की काही पक्षांचा विकास झाला, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मग घाबरता कशाला?
गोव्यात शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होईल असे भाजपचे नेते सांगत आहेत याकडे लक्ष वेधले असता, आमचा पक्ष एवढा कमजोर समजत असतील तर आमच्यावर टीका का करता, भीती कसली वाटते, असा सणसणीत प्रश्न त्यांनी केला.































































