शेतकऱ्यांची अडवणूक कराल तर धडा शिकवू, आदित्य ठाकरे यांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड / हिंगोली

दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच पिचला आहे. कर्जमुक्तीच्या नावावर त्याची बँकांकडून अडवणूक होणार असेल, त्याचा अपमान करण्यात येणार असेल तर याद राखा! गाठ शिवसेनेशी आहे. शेतकऱ्यांना नाडणाऱ्यां बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत असा खणखणीत इशारा शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

नांदेड जिल्ह्यातील मरळक, खडकी, निळा, हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव, ता. वसमत, तेलगाव, हट्टा येथे त्यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव वरुण सरनाईक, सिद्धेश कदम, पूर्वेश सरनाईक, कोअर कमिटीचे सदस्य विपुल पिंगळे, डॉ. गणेशराजे भोसले, नांदेडचे विस्तारक ऍड. अमित गीते, जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आदी उपस्थित होते.

ज्या ज्या वेळी अडचण येईल त्या त्या वेळी शिवसेनेची आठवण करा. जातपात, धर्माचा विचार न करता जो कोणी गरजू असेल, जो कोणी हतबल असेल त्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही आदित्य यांनी दिली. आज या दौऱ्यात त्यांनी मरळक, निळा, आसेगाव, खडकी येथील सर्वच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार जयप्रकाश मुंदडा, आमदार हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदी उपस्थित होते.

पेयजल योजनेचे उद्घाटन
60 वर्षे हट्टावासीयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होती व यासाठी कायमस्वरूपी नळयोजना नव्हती, मात्र आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रयत्नातून हट्टा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या योजनेचे उद्घाटन आज शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.