यांना महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्क नाही – आदित्य ठाकरे

नांदेड, संभाजीनगर शासकीय रुग्णालयातील मृत्यूंवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात कोलमडून गेल्याचे ढळढळीतपणे दिसतेय. लोकांच्या जिवाची यांना पर्वा नाही, परिस्थितीचे गांभीर्य नाही. अशा लोकांना सत्तेच्या खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्कच नाही! असे त्यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे. ‘हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय’, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मिंधे – फडणवीस राजकारणात बिझी! दुक्कल दिल्ली दौऱयावर

शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू असताना मिंधे-फडणवीस राजकारणात बिझी आहेत. आजारपणाचे कारण देत मिंधे सरकारवर नाराज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारताच त्यांच्या आजारपणावरील उपचारासाठी दुक्कल दिल्लीला रवाना झाली.

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 8 तर मिंधे गटाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजितदादा गटाने अधिकच्या मंत्रिपदाबरोबर सातारा, पुणे आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला आहे. शिंदे व फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीतून सत्तेतील वाटय़ाचे गणित जुळत नसल्याने अजितदादांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडली आणि त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला जाण्याचे टाळले. सत्तेच्या साठमारीत अजितदादांचे  आजारपण अधिक बळावण्याच्या भीतीने मिंध्यांना सोबत घेऊन फडणवीसांनी तातडीने दिल्ली गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप मोठा भाऊ…

महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र या सरकारमधील घटक पक्षांत भाजप हा मोठा भाऊ आहे. मोठय़ा भावाला आवश्यकतेप्रमाणं कधी त्याग करून भावंडांना सांभाळूनही घ्यावं लागतं, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे सरकार आणि पक्षांतर्गत नाराजांचे कान टोचले.