दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आदित्य ठाकरे आज मराठवाड्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-thackeray

सामना प्रतिनिधी, नांदेड

दुष्काळाच्या संकटकाळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या मंगळवारपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. नांदेड व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

सकाळी 11 वाजता नांदेड येथे विमानाने आगमन झाल्यानंतर ते हदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. वरवंट येथे दुपारी 12 वाजता त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणार आहे. दुपारी 1 वाजता ते कळमनुरी मतदारसंघातील आखाडा बाळापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देतील. याच मतदारसंघात तोंडापूर येथेही दुपारी शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चारावाटप करण्यात येणार आहे. दुपारी 3.45 वाजता ते नांदेड- दक्षिण मतदारसंघातील काकांडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. येथे त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चारावाटप करण्यात येणार आहे. दुपारी 4.30 वाजता तुप्पा येथे आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

बुधवारी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील खडकी येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पाणी योजनेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर निळा व मरळक येथे ते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. दुपारी 2.45 वाजता वसमत मतदारसंघात हट्टा येथे पाणी योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

गुरुवारी पीपल्स कॉलेजच्या मैदानात युवतींसाठी स्वसंरक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आदित्य ठाकरे हे स्वतः युवतींना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता देगलूर मतदारसंघातील वन्नाळी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी 1.30 वाजता त्यांच्या उपस्थितीत एकलारा येथे चारावाटप करण्यात येणार आहे.

आदित्य यांच्या उपस्थितीत उद्या दुष्काळ निवारण संकल्प शिबीर

परभणी – शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

दुपारी 2 वाजता झीरो फाटा येथे एरंडेश्वर शिवारात आयोजित दुष्काळ निवारण शिबिराला आदित्य ठाकरे हे मार्गदर्शन करतील. त्यानंतर त्यांच्या हस्ते ‘जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी’चे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शेळ्या-मेंढयांचे वाटप, महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीनचे वाटप, मोफत पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या 100 युवक-युवतींना प्रशिक्षण सामग्रीचे वाटप आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी विकास परिषदेअंतर्गत स्थापित शेतकऱ्यांच्या उद्योगांना हळद, रेशीम, कडधान्य आदी क्लस्टर विकसित करून दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.