Irshalwadi Landslide – आदित्य ठाकरे यांची धाव, दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सकाळीच इर्शाळवाडी येथे धाव घेतली. नानेवाडी येथे उभारलेल्या तंबूचा आसरा घेतलेले जखमी गावकरी व मृतांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली.

आदित्य ठाकरे यांना पाहताच इर्शाळवाडीवासीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सांत्वन केले. परिस्थिती खूपच भीषण आहे. सरकारी यंत्रणा आणि एनडीआरएफ प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो आणि सर्वजण सुखरूप राहोत अशी प्रार्थना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

वातावरणीय बदल आपल्याला दिसू लागले आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी जास्तीचा पाऊस तर कधी दुष्काळ अशा विचित्र घटना जगभरात घडत आहेत. त्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. आवश्यक त्या उपाययोजनांबाबत आज विधीमंडळात चर्चा सुरू आहे. सर्व पक्षाचे आमदार, तज्ञ यांनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला कसा करावा यावर उपाय शोधणे गरजेचे आहे असे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अॅड. अनिल परब, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू उपस्थित होते.

दानवे सकाळपासून घटनास्थळी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावलेल्या गावकऱयांची भेट घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. दानवे यांनीही मदतकार्यासाठी यंत्रणांशी समन्वय ठेवला.