
पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी मुंबई प्रदेशातील समित्या वगळून महाराष्ट्रातील सर्व स्तरावरील समित्या बरखास्त करण्याची घोषणा आम आदमी पक्षाच्या वतीने आज करण्यात आली. सर्व स्तरावर संघटना मजबूत करून महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुका लढवण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
आम आदमी पार्टी हा एक राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे. आम आदमी पार्टी सक्रिय राजकीय भूमिका बजावत असलेल्या इतर राज्यांमध्ये जसे केले गेले आहे त्याचप्रमाणे पक्ष संघटनेची पुनर्बांधणी महाराष्ट्रात करण्यात येईल. त्यानंतर येणाऱ्या सर्व निवडणुका आम आदमी पार्टी जोमाने लढवून महाराष्ट्रात पक्षाचा झेंडा फडकवेल, असा विश्वास पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आणि मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी व्यक्त केला.


























































