मरण पत्करू पण झुकणार नाही, संजय ‘सिंह’ यांची गर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना बुधवारी मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. सिंह यांच्या घरावर ईडीने बुधवारी सकाळी सात वाजता धाड टाकली त्यानंतर तब्बल दहा तास त्यांच्या घरात शोधाशोध केल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास सिंह यांना ईडीने अटक केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकाराच्या भ्रष्टाचाराविरोधात व अदानींच्या महाघोटाळ्याविरोधात आवाज उठवल्याने आपल्याला अटक करण्यात आली आहे. मात्र आपण मरण पत्करू पण त्यांच्या दबावापुढे आपण झुकणार नाही’ अशी सिंहगर्जनाच संजय सिंह यांनी केली आहे. आपने संजय सिंह यांचा अटकेच्या आधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

”नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचारी सरकारविरोधात, अदानींच्या महाघोटाळ्यांविरोधात मी सतत बोलतोय. त्याविरोधात कायम आपला आवाज उठवत आलोय. ईडीमध्ये नेहमी या घोटाळ्यांविरोधात तक्रार केली पण त्यावर काही कारवाई नाही झाली आणि आज अचानक ईडी माझ्या घरी पोहोचली. दिवसभर शोधाशोध केली. तपास केला. काही सापडलं नाही त्यांना तरीही मला जबरदस्ती अटक केली. आम्ही आम आदमी पार्टीचे शिपाई आहोत. मला मोदीजींना सांगायचंय की तुम्ही निवडणूक हरत आहात. खूप वाईटरित्या हरणार आहात. त्यामुळे तुम्ही हताश झाला आहात याचेच हे संकेत आहेत. तुम्ही हरणार आहात त्याचे हे संकेत आहेत. हे उदाहरण आहे या गोष्टीचे की एक भित्रा, डरपोक प्रधानमंत्री कशाप्रकारे तानाशाही करून लोकांना जेलमध्ये टाकून निवडणूका जिंकू पाहत आहे. पण मला मोदींना आठवण करून द्यायचं आहे की जेव्हा जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा त्या विरोधात जनतेचा आवाज बुलंद होतो. मला मरण पत्करणं मंजूर आहे पण घाबरणं नाही. कितीही त्रास दिलात तरी मी झुकणार नाही. नरेंद्र मोदी सराकराच्या भ्रष्ट्राचार, अदानींच्या घोटांळ्याविरोधात बोलत राहणार. संपूर्ण दिवसाच्या छापेमारीत काहीही सापडलं नाही. आता खोट्या बातम्या दिल्या जातील, खोटी माहिती पसरवली जाईल”, असे संजय सिंह यांनी त्या व्हिडीओतून सांगितले आहे.