
विधानसभा निवडणुकीचा निधी उभारण्यासाठी दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षाने मतदारांच्या खिशातच हात घातला आहे. जनसंपर्क अभियानाच्या नावाखाली 24 डिसेंबरपर्यंत दररोज चहापान, लंच, डिनर अशा जेवणावळी आयोजित करून पक्षासाठी ‘फंड’ गोळा करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.
नोव्हेंबर महिन्यापासून दिल्लीत ‘आप’चे जनसंपर्क अभियान सुरू झाले आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे अभियान सुरू राहणार असून याद्वारे चहापान, दुपार आणि रात्रीचे जेवळ आयोजित करून निधी गोळा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका बैठकीत दिल्याचे दिल्ली सरकारमधील रोजगार विकासमंत्री गोपाळ राय यांनी सांगितले. या बैठकीला केजरीवाल यांच्यासह उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह तसेच काही अन्य नेते उपस्थित होते. या अभियानासाठी संपूर्ण दिल्ली विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर सार्वजनिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ‘आप’ सरकारने 2700 प्रभारी स्वयंसेवकांची नेमणूकही केली आहे.






















































