
ईडी सरकारने सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या नावाखाली भाजपप्रणित आसाम सरकारला नवी मुंबईतील भूखंड देण्याचा घाट घातला आहे. आसाममध्ये मुख्यमंत्र्यांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या 40 आमदारांची चांगलीच खातीरदारी केल्यामुळे महाराष्ट्रात आसाम भवनासाठी जागा दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार दुसऱयांदा प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन आले. यावेळी आसाम सरकारने त्यांची चांगलीच खातीरदारी केली. या खातीरदारीमुळे खूश झालेल्या ईडी सरकारने त्या बदल्यात आसाम भवनासाठी जागा देण्याचे मान्य केले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी महाराष्ट्रात आसाम भवनासाठी जागा मागितली आहे. या मागणीवर महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून नवी मुंबईतील सिडकोची जागा देण्याबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र ही जागा आताच देण्याचे कारण ही खातीरदारी आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
आसाममध्ये महाराष्ट्र भवन
आसामच्या मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे. आसाममध्ये महाराष्ट्र भवन व्हावे, अशी मागणी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या मागणीला त्यांनी तत्काळ होकार दिला आहे. त्यामुळे आसाममध्ये महाराष्ट्र भवन होणार आहे. महाराष्ट्रातून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱया मराठी माणसांना मोठी सुविधा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
































































