आभाळमाया – गुरू-शुक्र पाहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक 

या लेखमालेतून आपण आधुनिक खगोलशास्त्रातील अनेक गोष्टी, अनेकदा प्राचीन काळी केल्या गेलेल्या खगोल अभ्यासाचेही संदर्भ जाणून घेत असतो. विज्ञानाभ्यास ‘प्रवाही’ असतो. अधिक अभ्यासानंतर पूर्वीच्या काही संकल्पना बदलतात. टॉलेमी यांनी सारी ग्रहमाला पृथ्वीभोवती फिरते असं म्हटलं. कारण तसं त्यांना प्रामाणिकपणे वाटलं. नंतर कोपर्निकस यांनी ते गृहीतक बदलून ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असं सांगितलं. परंतु सारं दृश्य ‘विश्व’ सूर्यपेंद्रित नाही आणि तो विश्वातला एक सामान्य (पण आपल्यासाठी जनक) तारा आहे हे सिद्ध झालं. प्राचीन हिंदुस्थानी खगोल अभ्यासकांना अवकाशस्थ ‘ज्योती’ म्हणजे तेजस्वी वस्तूंची बऱ्यापैकी माहिती होती. त्यांच्या अभ्यासाचे विज्ञान ते ‘ज्योतिःषास्त्र’ असं त्यांनी म्हटलं. तेच आजचे खगोल अभ्यासशास्त्र. मात्र त्यात ‘फलादेश’ किंवा ‘भविष्यकथन’ नसते तर विश्वाचा खगोल भौतिक पद्धतीने केलेला अभ्यास असतो. आपल्या महाराष्ट्रातल्या भास्कराचार्यांना पृथ्वी अधांतरी असून सूर्याभोवती फिरते हे ठाऊक होते.

विश्वरचनेच्या अभ्यासात सर्वप्रथम येते ती आपली ग्रहमाला. आपला सूर्य आणि पृथ्वी. एकेकाळी आपल्या नवग्रहांच्या संकल्पनेत सूर्य-चंद्र आणि राहू-केतू यांचाही समावेश होता. आताच्या आधुनिक खगोलशास्त्रात सूर्य हा तारा चंद्र, पृथ्वीचा उपग्रह आणि राहू-केतू हे बिंदू असल्याचं सिद्ध झालंय. सौरसंपुलात नऊ ग्रह 2006 पर्यंत मानले गेले. त्यात युरेनस-नेपच्युन यांच्याबरोबर प्लुटोचाही समावेश होता, परंतु ‘ग्रह’पदाच्या सर्व कसोटय़ा प्लुटो पूर्ण करू शकत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला ‘बुटक्या’ (खुजा) ग्रहाचं स्थान मिळालं. असे बदल वैज्ञानिक दृष्टी मान्य करते.

सौरमालेतील बाकीच्या ग्रहांविषयीसुद्धा आपण अनेकदा अनेक संदर्भांत वाचलंय आणि तरीही त्यांच्या विषयीची बरीच माहिती घेणं शिल्लक आहे. काही वर्षांपूर्वी ‘युरोपीय अॅस्ट्रॉनॉमिकल लीग’चे माजी फ्रेंच अध्यक्ष ज्याक्लॉड पेकर यांची भेट झाली होती. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, विश्वाची गोष्ट दूरच संपूर्ण पृथ्वी तरी आपल्याला समजली आहे का? खूप संशोधनाची गरज आहे. त्यांचं म्हणणं खरं होतं. अभ्यासातील अशी अतृप्तता जिज्ञासेला आणि चिकित्सेला जन्म देते. त्यातूनच अनेक गोष्टींमागचे विज्ञान समजू शकते.

हे सर्व झालं थिअरॉटिकल किंवा चर्चेच्या स्वरूपाचं विवेचन, परंतु खगोलशास्त्र्ााच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग म्हणजे नुसत्या डोळ्यांनी (किंवा दुर्बिण असेल तर) सातत्याने आकाश म्हणजेच अवकाश निरीक्षण. पाश्चात्य त्याला ‘स्टार गोझिंग’ म्हणतात. सूर्य वगळता इतर ‘ताऱ्यां’विषयी नुसत्या नजरेने जे अनुभवता येतं ते त्यांचे माणसांनीच ठरवलेले आकार. मृग नक्षत्राचा आकार आपल्या पळत्या आणि बाण लागलेल्या हरणासारखा दिसतो, तर ग्रीकांना त्याच आकारात एक शिकारी दिसला. मग त्याच्या पारंपरिक गोष्टीही बनतात. खगोलशास्त्र्ा शिकताना त्या मनोरंजकतेने ताऱ्यांची ओळख लक्षात ठेवायला उपयुक्त ठरतात. मात्र प्रत्यक्षात एका आकारात दिसणारे तारे एका प्रतळात नसतात हे अधिक अभ्यासांती समजतं.

तीच गोष्ट आपल्या ग्रहमालेची. प्राचीन खगोल अभ्यासकांनी चमकत्या अवकाशस्थ वस्तूंना ‘ज्योति’ असं म्हटलं तर लोकभाषेत त्यांचा उल्लेख ‘चांदणी’ असा केला जातो. म्हणूनच ‘शुक्राची चांदणी’ वगैरे शब्द काव्यात येतात. तारासुद्धा ‘ती’ तारका असते. एकदा कविवर्य मंगेश पाडगावकर यांची भेट झाली तेव्हा त्यांना शुक्र ‘तारा’ नाही हे सांगितलं. त्यावर ते म्हणाले हे आता विज्ञानातून कळतंय, पण शुक्राच्या तेजस्वितेमुळे पूर्वी सामान्य लोक त्याला ठळक चांदणी किंवा ‘तारा’च म्हणत.

त्यांचं म्हणणं खरं होतं. काव्यातला ‘शुक्र तारा, मंद वारा’ आणि प्रत्यक्षातला शुक्र ग्रह सध्या सायंकाळी सूर्यास्तानंतर लगेच ‘मंद वाऱ्या’सह आकाशात छान दिसतोय तो पहा. तो स्वतःभोवती ‘उलटा’ फिरतो किंवा त्याचा दिवस आणि वर्षाचं व्यस्त प्रमाण वगैरे काही माहीत नसलं तरी त्याची तेजस्विता मन प्रसन्न करेल. छोटी दुर्बिण मिळाली तर त्याची चंद्रासारखी ‘कोर’सुद्धा दिसेल. त्याचप्रमाणे गुरू हा ग्रहमालेतला सर्वात मोठा ग्रह संध्याकाळी डोक्यावर दिसतोय. दुर्बिण त्याचे चार चंद्रही दाखवेल. थोडी वाट पाहिलीत तर लाल मंगळही पहाटे दिसेल आणि सायंकाळी मृग नक्षत्राचंही (व्याधासह) निरीक्षण करता येईल. मुंबईतल्या वातावरणातही जिथल्या इमारतींच्या खिडक्यांमधून पश्चिम क्षितिज दिसू शकतं तिथून हे ठळक ग्रह छान दिसतील. सुंदर कडी असलेला शनीही पहाटेच पूर्वेला पाहायला मिळेल.

पूर्व आणि पश्चिम क्षितिजं ‘मोकळी’ असणं शहरी भागात उंच इमारतींमुळे कठीण, पण गावखेडय़ात ते सहज शक्य आहे. आता पावसाळी ढग हळूहळू येऊ लागतील तेव्हा आकाशनिरीक्षण पुढचे चार-पाच महिने क्वचितच होईल. त्यासाठीचा उत्तम कालावधी कोणता ते आपण ऑक्टोबरमधल्या एखाद्या लेखात जाणून घेऊच. पण तत्पूर्वी आकाशदर्शनाचा हा सीझन संपत असताना सहज दिसणारे अवकाशीय आविष्कार संध्याकाळी आणि पहाटे जाग येण्याची सवय असेल तर सूर्योदयापूर्वी (चालायला/धावायला जाताना) सहज पूर्वेकडे पाहा. असं ‘प्रॅक्टिकल’ शिक्षण ‘नकळत’ घेतलं तरी त्यातून मेंदूत खगोलीय ‘डेटा’ (विदा) साठतो. त्याचे मर्म काय हे नंतर ‘थिअरी’ सांगते. एखादी भाषा शिकताना आधी ती बोलायला शिकावी. व्याकरणाने ती परिपूर्ण नंतर करता येते. मातृभाषा आपण अशीच नकळत ‘कळून’ घेतो. कोणत्याही अभ्यासात कुतूहल महत्त्वाचं.
[email protected]