
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे अभंगवाणी हा भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगीत नाटकांतील भक्तीगीते अशी संकल्पना असलेला हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मंडळाच्या ल. वि. केळकर वसतीगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
अभंगवाणी कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना हार्मोनियमवादक निरंजन गोडबोले यांची आहे. संगीत कान्होपात्रा, गोरा कुंभार, मदनाची मंजिरी, कुलवधू, प्रीतीसंगम अशा नाटकांतील पदे या कार्यक्रमात रंगणार आहेत. संगीत रंगभूमीवर दोन रौप्यपदक विजेत्या व रत्नागिरीच्या आघाडीच्या गायिका सौ. श्वेता जोगळेकर, गायिका व संगीत शिक्षिका सौ. प्राजक्ता जोगळेकर, उदयोन्मुख गायिका सौ. प्राची रानडे आणि चिपळुणचा आघाडीचा गायक वरद केळकर गायन करणार आहेत. त्यांना ऑर्गनसाथ विलास हर्षे, तबला निखील रानडे, हार्मोनियम संतोष आठवले व निरंजन गोडबोले, पखवाज विजय ठाकूर व तालवाद्य हरेश केळकर साथ करतील. अभ्यासपूर्ण निवेदन सौ. सुप्रिया टोळ्ये करतील. कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे प्रसिद्ध ऑर्गनवादक विलास हर्षे सर यांचे मोलाचे सांगीतिक मार्गदर्शन लाभत आहे.
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. गेली सात वर्षे श्रावण कीर्तन सप्ताह होत आहे. यंदा १२ ते १८ ऑगस्टदरम्यान होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व कार्यवाह राजेंद्र पटवर्धन व कार्यकारी मंडळाने आवाहन केले आहे.





























































