
>> सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
पोटाच्या आसनांच्या शृंखलेतील आसन म्हणजे पवनमुक्तासन होय. पवन म्हणजे प्राणशक्ती. याच्यामुळे शरीरातील नाडय़ा शुद्ध होतात. एकाच वेळी नाभी प्रदेशातील आणि पाठीच्या मणक्यातील नाडय़ा शुद्ध होतात. प्राणांचे संचालन नाडय़ांमधून मुक्तपणे सुरू होते. म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हटले जाते.
लाभ कोणते
या आसनामध्ये मांडय़ांचा दबाव हा आपल्या पोटावर येतो आणि त्यामुळे सर्वप्रथम पोटातील जे विभिन्न अवयव, छोटय़ा आणि मोठय़ा आतडय़ा, स्वादुपिंड, किडनी, मूत्रपिंड इत्यादींवर चांगल्या प्रकारे दाब येतो आणि त्यांचे कार्य सुरळीतपणे चालू होते. हे वातविकारावरही अतिशय उपयुक्त मानले जाते. पोटामध्ये आणि ओटीपोटामध्ये रुधिराभिसरण, आतडय़ांचे विकार, वातदोष दूर होतो. अपचन, बद्धकोष्ठता नष्ट होतात. पाठीच्या कण्याला आराम मिळतो. ज्यांना स्पॉण्डिलायटिस किंवा व्हर्टिगो व्याधी असतील तर त्यांनी या आसनात मान वर उचलून हनुवटी गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करू नये.
एकैकपाद पवनमुक्तासन
या आसनासाठी सर्वप्रथम जमिनीवर पाठीवर सरळ झोपावे. पाय जोडून ठेवावेत. हातांचे तळवे जमिनीला चिकटवून ठेवावेत. त्यानंतर सर्वप्रथम आपला डावा पाय दुमडून घ्यावा. दोन्ही हातांची पकड बनवून त्या पकडीत डावा पाय पकडून पायाच्या मांडीने आपले पोट दाबून ठेवावे. थोडा वेळ या स्थितीमध्ये स्थिर रहावे. नंतर सावकाशपणे मान वर उचलून हनुवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. हनुवटी गुडघ्याला लागत असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करावा. काही क्षण अशा स्थितीमध्ये स्थिर रहावे.
द्विपाद पवनमुक्तासन
हेच आसन दोन्ही पायांनी एकत्रितपणे करावे. दोन्ही पाय जोडून ठेवावेत आणि दोन्ही पाय एकाच वेळी दुमडून हातांची पकड करून हातांनी पायांच्या मांडय़ा पोटावर दाबून ठेवाव्यात. नंतर मान वर उचलून हनुवटी आणि थोडय़ा वेळाने कपाळ गुडघ्यांना लावावे. इतके झाल्यानंतर सावकाशपणे याच आसनामध्ये थोडे मागेपुढे रोलिंग करावे. त्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्याला आणि पाठीच्या स्नायूंनाही चांगला व्यायाम किंवा मसाज मिळतो. नंतर सावकाशपणे डोके खाली आणावे. पकड सोडावी .
www.bymyoga.in





























































