
कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसमधील ‘थर्ड इकॉनॉमी क्लास’च्या डब्यातील एसी बंद पडल्याने प्रवासी उकाड्याने अक्षरशः हैराण झाले होते. एसी डबा असल्यामुळे कोचमधील खिडक्या बंद होत्या. परिणामी, प्रवास करणाऱ्या लहान मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची अक्षरशः घुसमट झाली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
कोकणात धावणारी मांडवी एक्स्प्रेस खेड रेल्वे स्थानकात पोहोचताच, तिच्या ‘थर्ड इकॉनॉमी क्लास’च्या डब्यातील एसी अचानक बंद पडला. सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटलेल्या मांडवी एक्स्प्रेसच्या ‘३ ई’ (3E) डब्यातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाली. एसी डबा असल्याने खिडक्या उघडण्याची सोय नव्हती, तसेच डब्यात पंख्यांचीदेखील सुविधा नव्हती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शुद्ध हवा डब्यात येण्यास अडचण होत असल्यामुळे प्रवासी गुदमरले होते.
रेल्वे रिफंड देणार का?
रत्नागिरी रेल्वे स्थानकात मांडवी एक्स्प्रेसला थांबवण्यात आले, त्यानंतर इंजिन बदलण्यात आले. २५ मिनिटांच्या हॉल्टनंतर एसी यंत्रणा सुरू करण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. मात्र, प्रवासादरम्यान झालेल्या मनस्तापाचा रेल्वे रिफंड देणार का? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.


























































