
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळच्या रामकुंड वळणावर मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी कार वाहनचालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या कठड्यावर आदळली. हा अपघात रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला.
कारचालक परशुराम पुरुषोत्तम ठाकूर (रा. रत्नागिरी, फिनोलॅक्स कॉलनी) हे मुंबईहून रत्नागिरीकडे जात होते. संगमेश्वरजवळच्या रामकुंड वळणावर त्यांची गाडी आली असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी पुलाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात गाडीच्या पुढील भाग चेपला गेला. या अपघातात कारमधील महिला जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामकुंड वळणावर कारची धडक बसणार हे समजताच कंटेनर चालकाने धडक वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रसंगावधानामुळे जीवीतहानी टळली. कंटेनर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जात होता. अपघाताचे वृत्त समजताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.





























































