
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी (खु.) गावात दुचाकी -स्कॉपिओची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नळणी खु.गावातील मुख्य रस्त्यावर झाला आहे. यात लोकशाहीर जनार्धन शेषराव वराडे ( वय 50, रा.नळणी, खु., ता.भोकरदन जि.जालना) यांचा उपचारादरम्यान संभाजीनगर येथे मृत्यू झाला. तर जखमी विजय लक्ष्मण सरोदे यांच्यावर सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भोकरदन तालुक्यातील नळणी खु. येथे जनार्धन वराडे सांयकाळी 7 वाजेदरम्यान विजय सरोदे यांना शेतात सोडण्यासाठी दुचाकीवर जात होते.त्याचवेळी तडेगाव येथून भरधाव वेगाने येणार्या स्कॉपिओने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चालकाने गाडी भरधाव वेगात पळवली. ग्रामस्थांनी जनार्धन वराडे, विजय सरोदे यांना जखमी अवस्थेत भोकरदन येथे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांना संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. संभाजीनगर येथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे जनार्धन वराडे यांचा मृत्यू झाला.
या घटनेने संतप्त झालेल्या वराडे यांच्या नातेवाईकांनी मृतदेहासह भोकरदन पोलीस ठाणे गाठले. आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत मृत्यूदेह हलवणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेत दोन तास भोकरदन ठाण्यासमोरा ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत नळणी खु. येथे अत्यंसंस्कार केले. वराडे यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार परिवार आहे.
भोकरदन पोलीस ठाण्यात कमलकर शेषराव वराडे यांच्या तक्रारीनुसार स्कार्पिओ चालक विशाल धनसिंग घुसिंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास भोकरदन पोलीस करीत आहे.

























































