धोकादायकरित्या उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला एसटी बसची धडक, सात जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

मुंबई अलिबाग एसटी बस व ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात चालक, वाहकासह 6 प्रवासी किरकोळ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील पळी येथे हा अपघात झाला. गंभीर जखमी झालेले प्रवासी प्रदीप घरत यांना मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर इतर किरकोळ प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.

प्रदीप घरत (58), सचेंद्र गावंड (26), महेश कवळे (54), अजय महाडिक (32), संतोष मोकल (30), विजय लोखंडे (48), राजेंद्र सुपे (35) हे प्रवासी तर मुंढे (चालक), तानाजी राठोड (वाहक) हे एसटी चे कर्मचारी जखमी झाले आहेत.मुंबई येथून रात्री दहाच्या सुमारास आराम बस ( एमएच 20/ बिएल 3229) अलिबागकडे प्रवाशांना घेऊन निघाली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरामबस चरी ते पळी दरम्यान आली असता समोरून येणाऱ्या वाहनांची हेडलाईट डोळ्यावर आल्याने व त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला विटांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच 06/एएच 9937) रिफ्लेक्टर व टेल लाईट बंद अवस्थेत धोकादायक रित्या उभा होता. डोळे दिपल्याने एसटी चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाऊन बस धडकली.

एसटी बसची धडक मागून ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात बसल्याने ट्रॅक्टर बाजूच्या शेतात जाऊन पडला तर बस मधील चालक, वाहकासह सात प्रवासी जखमी झाले. यातील प्रदीप घरत याच्या दोन्ही पायाला, तोंडाला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईत हलविले आहे. तर इतर किरकोळ प्रवाशांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. एसटी महामंडळाकडून पाच जखमी प्रवाशांना मदत दिली असून दोन जणांनी मदत नाकारली आहे.