
सामना प्रतिनिधी । चाकूर
तालुक्यातील घरणीजवळ व राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी रात्री ट्रे्लर व कारच्या झालेल्या भीषण अपघातात एका अभियंत्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारवर ट्रेलर उलटल्याने अपघात झाला होता. अपघातानंतर सुमारे दीड तासांनी क्रेनच्या साह्याने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील घरणी येथे गुरूवारी रात्री 10 वाजता लातुरहून नांदेडकडे ट्रेलर सिंमेट घेऊन जात होता. त्याचवेळी अहमदपूरहून कार लातुरकडे जात होती. ट्रेलर चालकाच्या चुकीमुळे कारला जोराची धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकले गेले. कारवर ट्रेलर उलटल्याने कारमधील प्रवासी दबले गेले होते. स्नेहा दिलीप उगीले (वय 24) यांना कारमधून बाहेर काढून चाकुर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अपघातात कार पूर्ण दबली असल्याने इतरांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. जेसीबी व क्रेनच्या साह्याने तब्बल दीड तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेले विलास उगीले (वय 55),त्यांच्या पत्नी राजकमलबाई उगीले (वय 50) आणि मेहुणा दिलीप मोरे (वय 40) यांना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. अभियंता विलास उगीले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रेलरचा चालक फरार असून शुक्रवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. विलास उगीले यांच्यावर उगीलेवाडी येथे शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले

























































