
सामना ऑनलाईन । पुणे
आजारी असणाऱ्या मित्राला रुग्णालयातून भेटून येताना कार व दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
रोहित कुमार राम (वय २०, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याचा मित्र चिंटू संतोषसिंग कुमार (वय १८) हा जखमी झाला आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौकात गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात कारचालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी कारचालक जमीर वलीसाब शेख (वय २९, रा. येरवडा) याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राम हा वाकडमधील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करतो. दरम्यान, त्याचा एक मित्र आजारपणामुळे केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याला पाहण्यासाठी रोहित व त्याचा मित्र चिंटू हे दोघे गुरुवारी हॉटेलमधील काम संपल्यानंतर रुग्णालयात गेले होते. त्याला पाहून ते परत दुचाकीवर वाकड येथील घरी निघाले होते. दरम्यान, ते मनपाकडून घोले रोडने जात होते, तर त्याचवेळी कारचालक हा संचेती हॉस्पिटलमधून डेक्कन जिमखान्याकडे जात होता. रात्रीची वेळ असल्याने दोघेही वेगात होते. अचानक झाशी राणी चौकात रोहित याच्या दुचाकीला कारने जोरात धडक दिली. यात तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मित्र चिंटू हा जखमी झाला.
यात कारचालक जमीर शेख हाही जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
























































