
सामूहिक बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या 19 वर्षीय तरुणाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या घटनेतील पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती स्वत: घराबाहेर निघून आरोपींसोबत गेल्याचे व त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे मत नोंदवत न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी हा निर्णय दिला.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अर्जदार आरोपीविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा आरोप चुकीचा असून अर्जदाराला नाहक गोवले जात आहे. पीडित मुलगी कुटुंबिय झोपल्यानंतर स्वत:हून घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन मित्रासोबत गेली. केवळ एका आरोपीसोबत न जाता ती विविध ठिकाणी विविध मित्रांसोबत स्वत:हून गेली. त्यादरम्यान तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. तिचे वर्तन संशयास्पद आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अर्जदार आरोपी तरुणाला 30 हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश दिला. या प्रकरणात आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील ऍड. मजीद मेमन, ऍड. मतीन कुरैशी क ऍड. खलील गिरकर यांनी तर सरकारतर्फे ए. ए. टाकळकर यांनी काम पाहिले. गुह्यातील सर्व आरोपी दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. तसेच खटला नजीकच्या काळात सुरु होण्याची शक्यता नाही, ही बाबही न्यायालयाने निकाल देताना विचारात घेतली.


























































