
शस्त्राचा धाक दाखवत पुणे येथील व्यापाऱ्याला लातूरमध्ये लुटण्यात आले होते. या गुन्ह्यांत दोघांचा समावेश होता. त्यामध्ये एक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. चोरी झालेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पुणे येथील एक व्यापारी व्यवसायाच्या निमित्ताने शुक्रवारी लातूर शहरात आले होते. त्यांनी त्यांच्या पाठीवर सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25 हजार रुपये असलेली बॅग अडकवून व्यापार करून परत ते थांबलेल्या लॉजकडे चालत जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवत रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास एका कापड दुकानाजवळ, रोडवर तक्रारदारांच्या पाठीवर असलेली दागिन्यांची व रोख रकमेची बॅग चोरट्याने हत्याराचा धाक दाखवत हिसकावत मोटरसायकलवरून पोबारा केला. सोन्याची दागिने व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 48 हजार 240 रुपयांची चोरी झाली होती.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी भेट दिली. जगदाळे यांनी त्यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदारांना तपासाच्या सूचना देत शहरात रवाना केले. सहाय्यक फौजदार वहीद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, यशपाल कांबळे, पोलीस अंमलदार दामोदर मुळे व शिंदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी या गुन्ह्यातील रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे (रा.जुना औसा रोड, लातूर) एक संघर्ष बालक अशांना निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याच्या संबंधाने विचारपूस करून 12 तासांच्या आत आरोपींना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात चोरलेली रक्कम व सोन्याचे दागिने असा 5 लाख 48 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल व पिस्तूलसारखो हत्यार जप्त करण्यत आले आहे. विशेष पथकातील पोलिसांनी 48 तासांच्या आत गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.






























































