
सामना प्रतिनिधी । नगर
मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. गेल्या पाच महिन्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली होती. पाच महिन्यात 600 मद्यपींवर कारवाई केली आहे. तर अनेकांना दंडही ठोठावला आहे. वाहतूक शाखेकडून दररोज कारवाई करण्यात येत आहे. दिवसाला दोन-तीन जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून न्यायालयात हजर करण्यात येत आहे. गेल्या पाच महिन्यात शहरामध्ये साडेसहाशेहून अधिक मद्यपी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये दुचाकी, ट्रक, कारचालकांचा समावेश आहे.
नगर शहरातून नगर-पुणे, नगर-मनमाड, नगर-संभाजीनगर, नगर-सोलापूर महामार्ग जातात. या महामार्गांवर अनेक दारूची दुकाने, हॉटेल्समध्ये परमीट रुम आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची आणि त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी नगर-मनमाडरोडवर मद्यपी कंटेनरचालकाने वेगात वाहन चालवून अनेक कार, मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात एका मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला होता. याआधी फक्त 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपान करणार्या चालकांविरूद्ध कारवाई केली जात होती. आता मात्र पोलिस दररोज कारवाई करीत आहेत. दररोज दोन-तीन वाहनचालक मद्यसेवन करून वाहन चालवत असल्याचे पोलिस कारवाईतून समोर आले आहे. या वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावाधीत शहरामध्येच 667 मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मे महिन्यात दीडशेहून अधिक जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर फेब्रुवारी महिन्यात 293 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक कारवाई मोटारसायकल चालकांवर झाली आहे. तरुण वर्ग बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी मद्यसेवन करून वाहने चालवत असल्याचे आढळून आले आहे.
























































