अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, न्हावा-शिवडी सि-लिंक, विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरिडॉर यामुळे रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण परिसरातील जागेला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे मोठे उद्योगपती, धनदांडगे यांनी या भागात जमिन घेण्याचा सपाटा लावला आहे. या धनदांडग्यांनी नियमांची पायमल्ली करून या परिसरात अलिशान फार्म हाऊस आणि मोठ मोठाले बंगले बांधले आहेत. उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या परिसरात रांजणखूटी नदिच्या पात्रांमध्ये अतिक्रमण करून अशा प्रकारे अनेक फार्म हाऊस बांधले आहेत. या अनधिकृत बांधकामामुळे नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला असून नदीचे पाणी नदीलगतच्या गावांमध्ये शिरू लागले आहे. त्यामुळे या अनधिकृत व नदीवर अतिक्रमण केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या निसर्गरम्य परिसरात कंठवली गावाजवळून वाहणाऱ्या रांजणखुंटी नदीच्या परिसरात अशा प्रकारचे अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. मुंबई व अन्य काही शहरातील धनदाडग्यांनी या नदी किनाऱ्यावर नियमाची पायमल्ली करून मोठं मोठे बंगले बांधले आहेत. त्याचा फटका नदीकाठी वसलेल्या विंधणे,कंठवली या गावांसह आदिवासींना बसण्याची शक्यता आहे. ही गावे पुरात बुडू शकतात.तसेच याठिकाणी सागरी प्रशिक्षण केंद्र आहे, तेही कोणतीही परवानगी न घेता शासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. याकडे त्वरित लक्ष देणे गरचेचे आहे अशी मागणी कुंदा ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान मंगळवारी मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रस्त्यावर व गावाच्या परिसरात शिरले होते. उरणच्या तहसिलदार कल्पना गोडे, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी यावेळी या परिसराची पहाणी केली. या अनधिकृत बांधकामाना नोटीसा पाठवून त्यांच्यावर लवकर कारवाई करण्यात येईल असे यावेळी तहसिलदार कल्पना गोडे यांनी सांगितले.