राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रेत’ आणखी एका अभिनेत्रीची हजेरी, फोटो केला ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
swara-baskar-rahul-gandhi

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या मध्यप्रदेशात पोहोचली आहे. यामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते, कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आज राहुल गांधी यांच्यासोबत मध्य प्रदेशातील उज्जैन येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत भाग घेतला.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलने स्वरा भास्करचा राहुल गांधींसोबतचा फोटो शेअर केला आहे.

‘आज प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर #BharatJodoYatra चा भाग बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उपस्थितीमुळे ही यात्रा यशस्वी झाली आहे’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपली मते बिनधास्त मांडणारी स्वरा भास्कर ही अनेकदा वादात राहिली आहे.

यापूर्वी अमोल पालेकर, संध्या गोखले, पूजा भट्ट, रिया सेन, सुशांत सिंग, मोना आंबेगावकर, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी या चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी यात्रेत भाग घेतला होता.

हॉलिवूड स्टार जॉन क्युसॅकने ट्विटरवर सप्टेंबरच्या उत्तरार्धात काँग्रेसच्या या यात्रेला पाठिंबा दर्शविला होता.

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर ते गुरुवारी सकाळी उज्जैनहून ही यात्रा पुन्हा सुरू झाली आणि आगर माळवा या मध्य प्रदेशातील शेवटच्या जिल्ह्याकडे निघाली. ही यात्रा 12 दिवसांत राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम मध्य प्रदेशातील माळवा-निमार भागात 380 किमीचे अंतर पार करणार आहे.

भाजप शासित या राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

मध्य प्रदेशातून ही यात्रा 4 डिसेंबरला राजस्थानमध्ये दाखल होईल, असा कार्यक्रम काँग्रेसने जाहीर केला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात दाखल झाली होती.

ते आतापर्यंत मध्य प्रदेशातील बुरहानपूर, खंडवा, खरगोन आणि इंदूर जिल्ह्यातून गेले आहेत.

भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली.