
अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरेने ऑगस्ट महिन्यात नांदेड येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. आशुतोष नैराश्याने ग्रस्त होता व त्याला सांभाळण्यासाठी मयुरीने कामातून ब्रेक घेतलेला. मात्र तरी आशुतोषने टोकाचे पाऊल उचलले.
आशुतोषच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मयुरी पुनरामन करत आहे. मयुरी लवकरच आपल्याला स्टार प्लसवरील इमली या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत गश्मीर महाजनी हा मराठमोळा अभिनेता मुख्य भुमिकेत आहेत. मयुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्या सोबत तिने सर्व चाहत्यांचे आभार मानणारी पोस्ट देखील शेअर केली आहे. ‘तुम्हा सर्वांनी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रेमातूनच प्रोत्साहन घेत मी नवीन सुरुवात करतेय. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्या’, असं तिने पोस्टमध्ये लिहलं आहे.
मयुरी याआधी खुलता कळी खुलेना या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील तिची भुमिका चांगलीच गाजलेली. मयुरीचा पती अभिनेता आशुतोष याने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’, या चित्रपटात अभिनय केलेला आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्यासोबत 21 जानेवारी 2016 ला तो विवाह बंधनात अडकला होता.


























































