जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगानाथ शिवमंदिरात नृत्यआराधाना, अभिनेत्री मीरा जोशीचा नवा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये असलेले तुंगनाथ शिवमंदिर हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले मंदिर आहे. तुंगनाथ पर्वतावर असलेले हे शिवमंदिर 11 हजार 385 फूट उंचीवर आहे. या शिवमंदिरासमोर अभिनेत्री, नृत्यांगना मीरा जोशी हिने नृत्य करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. तिच्या नृत्याविष्काराची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. मीराला अभिनयाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे. 16 मार्च रोजी पहाटे 3 वाजता तिने चंद्रशीला शिखरावर ट्रेकिंगला सुरुवात केली. ती सूर्योदयाच्या वेळी शिखरावर पोचली.

त्याखालीच असलेल्या प्राचीन तुंगानाथ शिवमंदिरासमोर मीराने नृत्य सादर केले. मीराने या यशाचे श्रेय आईवडील आणि भावाला दिले आहे. याव्यतिरिक्त स्मित शाह, तुषार सुभेदार, चिंतन पांचाळ, आनंद बनसोडे या टीम सदस्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मी भगवान शंकराची भक्त असून तुंगानाथ मंदिराला भेट द्यावी हे माझं स्वप्न होतं. ते आता साकार झालंय. 16 मार्च रोजी तुंगानाथ मंदिर परिसरात बर्फ नव्हता. त्या संधीचा लाभ उचलत मी नृत्य केले. खरं तर तापमान सहा डिग्रीपर्यंत होते. तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने माझे ध्येय पूर्ण झाले.
– मीरा जोशी, अभिनेत्री