नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.मिलिंद लाठकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीचा निर्णय आज जाहीर झाला. अध्यक्षपदी अ‍ॅड.मिलिंद लाठकर विजयी झाले. त्यांनी अ‍ॅड.पी.एन. शिंदे यांचा ३८ मतांनी पराभव केला.

नोव्हेंबर २०१८ पासून नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली होती. अनेकदा या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. राज्य वकील संघटना आणि राष्ट्रीय वकील संघटना यांनी सुध्दा या निवडणुकीच्या कार्यक्रमात आपापल्या परिने आक्षेप घेतले. निवडणुकीची प्रक्रिया उच्च न्यायालयात सुध्दा गेली, पण या सर्व अडचणींच्या प्रक्रिया पार करत निवडणुकीचे कामकाज सुरुच होते. राष्ट्रीय वकील संघटनेच्या आदेशानुसार राज्य वकील संघटनेने या निवडणुतील तीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वकीलीतूनच निलंबित केले. याही समस्येतून नांदेड जिल्हा वकील संघटना आपल्या निवडणूक कार्यक्रमाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहत होती.

दि.११ मार्च रोजी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण ९६० मतदार होते. त्यापैकी ६४८ मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ६७.५ एवढी होती. आज दि.१२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड.जी.डी. सूर्यवंशी, सहनिवडणूक निर्णय अधिकारी राजेश नाईक आणि अ‍ॅड.एस.जी. सोनारीकर यांच्या समक्ष मतमोजणी सुरु झाली. मतमोजणीमध्ये अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अ‍ॅड.मिलिंद मधुकरराव लाठकर यांनी ३३९ मते प्राप्त केली. आणि अ‍ॅड.पी.एन. शिंदे यांना ३०१ मते मिळाली. ३८ मतांनी अ‍ॅड.मिलिंद लाठकर यांचा विजय झाला. उपाध्यक्ष पदामध्ये तीन उमेदवार होते. त्यातील पुनीत ग्यानोजी हनवते यांनी २२२ मते प्राप्त केली. अ‍ॅड.जगजीवन तुकाराम भेदे यांनी २४७ मते प्राप्त केली आणि अ‍ॅड.वीर राजाराम धोंडबाराव यांना १६० मते प्राप्त झाली. उपाध्यक्ष पदात २५ मते जास्त घेणाऱ्या अ‍ॅड.जगजीवन भेदे यांचा विजय झाला.

सचिव पदासाठी तीन उमेदवार होते त्यातील अ‍ॅड.नितीन लक्ष्मणराव कागणे यांनी आपला पाठिंबा अ‍ॅड.संजय राजेश्वर मलदोडे यांना पूर्वीच जाहीर केला होता. मतमोजणीमध्ये अ‍ॅड.गजानन रामकृष्ण पिंपरखेडे यांना १७३ मते मिळाली. अ‍ॅड.संजय राजेश्वर मलदोडे यांना ३५१ मते मिळाली. आणि नितीन लक्ष्मणराव कागणे यांना ३४ मते प्राप्त झाली. १९१ मतांचे अधिक्य घेत अ‍ॅड.संजय मलदोडे यांनी विजय मिळविला. सहसचिव या पदासाठी अ‍ॅड.अब्दुल नदीम खान अब्दुल गफूर खान यांनी १५४ मते मिळविली त्यांचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड.श्यामसुंदर शंकरराव वाकोडे यांनी ४४३ मते प्राप्त केली. याप्रमाणे २३९ मतांचे अधिक्य घेवून अ‍ॅड.श्यामसुंदर वाकोडे विजयी झाले. विशिष्ट सहायक या पदासाठी अ‍ॅड.चंद्रकांत यल्लपा मेटकर यांनी ३३४ मते प्राप्त केली. त्यांचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. दिलीप माधवराव गंगातीर यांनी २८० मते प्राप्त केली. ५४ मतांचे अधिक्य घेवून अ‍ॅड.चंद्रकांत मेटकर विजयी झाले.

या निवडणुकीत कोषाध्यक्ष या पदासाठी एकच अर्ज आला होता. त्यामुळे अ‍ॅड.माणिकराव वाखरडे यांची बिनविरोध नियुक्तीची घोषणा करण्यात आली. अभिवक्ता संघाच्या कार्यकारिणीमध्ये बारा सदस्य निवडले जातात त्या बारा जागांसाठी बाराच वकीलांची नावे आली होती. त्यात अ‍ॅड. सुभाष पुंजाजीराव भेंडे, अ‍ॅड. रणजितसिंह बायस, अ‍ॅड.लता निवृत्ती नवघडे, अ‍ॅड. विलास महाजनराव पवार, अ‍ॅड.शेख अब्दुल हक करीम, अ‍ॅड.संग्राम देवराव गायकवाड, अ‍ॅड.अंबादासराव रामराव बडगे, अ‍ॅड.प्रसाद नामदेवराव रानवळकर, अ‍ॅड.शेख शकील महंमद इब्राहीम, अ‍ॅड.प्रदीप उत्तमराव शिंदे, अ‍ॅड. अखमोद्दीन गियासोद्दीन, अ‍ॅड.मंगल शिवराज पाटील यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा आजच करण्यात आली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरातच विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.