
मुंबईसह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी सर्वांना संचारबंदी लागू केली आहे. परंतु राज्यातील रुग्णालये, हॉटेल, रेल्वे आणि इतर ठिकाणी लॉण्ड्री सेवा देण्यात येते. त्यामुळे राज्यातील लॉण्ड्री चालकांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा, अशी मागणी भारतीय धोबी समाजाचे अध्यक्ष शंकर रजक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यातील सर्व लॉण्ड्री चालक जीवाचा धोका पत्करून रुग्णालयातील कपडे आणि इतर साहित्य धुण्याचे काम करीत असून त्यांचा धोका लक्षात घेता ही मागणी करण्यात आल्याचे शंकर रजक यांनी यावेळी सांगितले.































































