नाशिकमध्ये रविवारी ‘आदित्य संवाद’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नाशिक

तरुणांचे विचार, अपेक्षा आणि त्यांना भेडसावणाऱया समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘आदित्य संवाद’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत आदित्य ठाकरे हे रविवारी, 7 एप्रिल रोजी नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहेत.
डोंगरे वसतिगृह मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे, विहांग सरनाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. राजकारणासह विविध क्षेत्रांसंबंधी तरुणांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी संभाजीनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता हा कार्यक्रम रविवारी नाशिकमध्ये होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ज्या तरुणांना आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा आहे, त्यांनी www.adityasanvad.com या वेबसाईटवर आपले नाव नोंदवावे, असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपा आमदार बाळासाहेब सानप, सचिन ठाकरे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, युवा सेना विस्तारक अमित पाटील, कुणाल दराडे, राहुल ताजनपुरे, राहुल दराडे, बाळासाहेब कोकणे यांच्यासह पदाधिकारी हजर होते.