मुंबई विद्यापीठाचे पहिले ‘स्कूल ऑफ इंजिनीयरिंग’ कल्याणमध्ये, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

19


सामना प्रतिनिधी । कल्याण

तब्बल एक तपाच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज मुंबई विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र सुरू झाले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या नव्या दालनाचे उद्घाटन झाले. या ठिकाणी विद्यापीठाचे पहिले ‘स्कूल ऑफ इंजिनीयरिंग’ सुरू होणार असून एकाच वेळी आठ पदव्युत्तर अभ्यासक्रमांची पर्वणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 2005 साली शिवसेनेने कल्याण उपकेंद्र सुरू करण्याची पहिल्यांदा मागणी केली. याची दखल घेऊन 2007 साली विद्यापीठाने कल्याण उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. यानंतर आज प्रत्यक्षात उपकेंद्र सुरू झाले. यावेळी बोलताना शिवसेना नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधुनिक काळाशी जोडणारे शिक्षण येथे मिळेल. शास्त्रशुद्ध शिक्षणाचे महाद्वारच याठिकाणी खुले झाले आहे. तर संशोधन आणि रोजगारक्षम शिक्षण देण्यासाठी कल्याण उपकेंद्राने महत्त्वाची भूमिका पार पाडावी यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. यावेळी महापौर विनिता राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, आमदार सुभाष भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख विजय साळवी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, समन्वयक डॉ. जगदीश बाकल आदी उपस्थित होते.

असे असतील कोर्सेस

मुंबई विद्यापीठ आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच स्वतःचे इंजिनीयरिंग डिपार्टमेंट आणि तेही कल्याण उपकेंद्रात सुरू करत असल्याची माहिती यावेळी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली. या ठिकाणी एम.टेक. इन कॉम्प्युटर इंजिनीयरिंग, केमिकल इंजिनीयर इन टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टेशन इंजिनीयरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ऍण्ड मशीन लार्निंग, मास्टर इन सायन्स ओशनोग्राफी, पीएचडी इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीयरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

नवीन उपक्रम, संकल्पनांना चालना मिळेल – आदित्य ठाकरे

मुंबई विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र नवीन उपक्रम आणि संकल्पनांना चालना देईल, असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला. या ठिकाणी समुद्र जिवांच्या अभ्यासासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिले जाणार आहे. ही आनंदाची गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या