
सामना प्रतिनिधी, हिंगोली
‘जनआशीर्वाद’ यात्रेच्या निमित्ताने सर्वच जिल्हय़ांत, तालुक्यांत, गावागावांत जात आहे. चार-दोन लोक जरी रस्त्यात थांबले तरीही त्यांची निवेदने, अडचणी जाणून घेत आहे. ही जनआशीर्वाद यात्रा तुमच्या मनातील दुःख, वेदना, तुमचे मन जाणून घेण्यासाठी आहे. राजकीय पक्षाला, नेत्यांना लोक निवेदने देतात. कारण त्यांचा विश्वास असतो की, मला मिळणारी निवेदने ही सरकारकडे जातील आणि त्यांचे काम होईल. जनतेचा हा विश्वास हेच माझे सौभाग्य असल्याचे भावोद्गार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले.
हिंगोली जिल्हय़ातील वसमत येथे भरपावसातही आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी शिवसैनिक व नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. सभास्थळी आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच ढोलताशा व ‘जय भवानी, जय शिवाजी, ‘कोण आला रे कोण आला…’, ‘शिवसेनेचा विजय असो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. व्यासपीठावर आल्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांनी शाल व विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा देऊन युवासेना प्रमुखांचे स्वागत केले.
खासदार हेमंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर भाषणाला उभे राहताच युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्ही लांब आहात, मग मी व्यासपीठावर कसा राहू, तुमच्यात मी येतो असे म्हणत आदित्य ठाकरेही व्यासपीठाखाली आले. जनतेत उभे राहून आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला.


























































