मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

चव्हाटा आंबेरी रस्ता (४.४ किमी) २ कोटी ६६ लाख, महान हुमरस (२.८२ किमी) १ कोटी ८७ लाख, चौके नवाघर देवली (२.१८ किमी) १ कोटी ६० लाख, बिळवस भोगलेवाडी (२ किमी) १ कोटी ४५ लाख, कुंभारमाठ पॉलिटेकनिक रस्ता (२.१० किमी) १ कोटी १२ लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हि कामे मार्गी लागणार आहेत.

मालवण तालुक्यातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. रस्ते खचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना कसरत करत या मार्गावरून वाहने चालवावी लागत आहेत. काही मार्ग वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. रस्ते दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रस्ते मंजुरीचा पाठपुरावा सुरू होता. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोकण प्रादेशिक विभाग ठाणेचे अधीक्षक अभियंता आर. एम. गोसावी यांच्याकडुन या कामाला मंजुरी मिळाली आहे.

रस्ता खडीकरण, डांबरीकरण, रुंदीकरण, चढावांची उंची कमी करणे आदी कामे केली जाणार आहेत. अन्य रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरण यासाठीही प्राधान्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी माहिती देताना सांगितले.