बनावट गुणपत्रिकेद्वारे बीएएमएसला प्रवेश, मायणीतील मेडिकल कॉलेजमधील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खटाव तालुक्यातील मायणी येथील रूरल इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर ऍण्ड हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजमध्ये कमी गुण असणाऱयांकडून पैसे घेऊन आणि बनावट गुणपत्रिका तयार करून बीएएमएसला प्रवेश दिल्याच्या तक्रारीची सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याचे निष्पन्न झाल्याने मनोज सुरेश कांबळे (रा. फलटण) यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2008 मध्ये अनिरुद्ध माने याला 12वी परीक्षेत 49.50 टक्के, मनोज निंबाळकर याला 50.17 टक्के गुण मिळाले होते. दोघांनाही बीएएमएस पदवीसाठी पीसीबी गुपमध्ये लागणारे 50 टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले नव्हते. मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक महादेश देशमुख, संचालक चंद्रकांत देशमुख व नागपूर येथील डॉ. त्रिदीप गुहा यांनी आर्थिक व्यवहार करून सेंट्रल बोर्ड ऑफ हायर एज्युकेशन (नवी दिल्ली) येथील बारावीची परीक्षा 52 आणि 54 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके माने आणि निंबाळकर या विद्यार्थ्यांना मिळवून दिली.

रेशीमबाग (नागपूर) येथील रामलाल जैन विद्यालय या शाळेचे शाळा सोडल्याचे बनावट दाखले जोडून त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला. सन 2006 मध्ये उस्मान सय्यद यालाही बारावी परीक्षेत कमी गुण मिळाले असताना तिघांनी त्याला बारावी परीक्षेत 62 टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रक आणि माधवराव अनंत इतकरी महाविद्यालय (पुणे) या अस्तित्वात नसलेल्या कॉलेजचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता. सन 2010 मध्ये शामला पाटील या विद्यार्थिनीलाही कमी गुण असताना 61 टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रक आणि गोंदियाच्या अस्तित्वात नसलेल्या एका कॉलेजचा शाळा सोडल्याचा दाखला तयार करून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता. या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडेही पाठविण्यात आली होती. हे सर्व प्रवेश देतेवेळी मोठे आर्थिक व्यवहार झाले होते.

याप्रकरणी मनोज कांबळे यांनी 18 मे 2021 रोजी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून अनिरुद्ध माने, मनोज निंबाळकर, उस्मान सय्यद, शामला पाटील यांनी बनावट दाखले प्राचार्य अरबुने यांना देऊन बीएएमएससाठी प्रवेश घेऊन पदवी घेतल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कांबळे यांना लेखी कळविले आहे. त्यानंतर 4 एप्रिल रोजी कांबळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास यंत्रणेवर जिह्यातील दोन मोठय़ा नेत्यांचा प्रभाव आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी मनोज कांबळे यांनी केली आहे.

चौघांवर गुन्हा दाखल

मनोज कांबळे यांनी 4 एप्रिल रोजी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. यातील एकाने अटकपूर्व जामीन घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, यातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येणार आहेत.