
स्मशानभूमीमध्ये जळत्या चितेसमोर अभ्यास करून उच्चशिक्षित झालेल्या मसनजोगीच्या मुलीला सांगोल्याचे सुपुत्र तहसीलदार संजय खडतरे यांनी दत्तक घेऊन शिक्षणाचा खर्च तर केलाच; त्याचबरोबर रविवारी (दि.14) तिचे थाटात लग्न लावून दिले.
स्मशानभूमी म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु या स्मशानभूमीतच शिक्षणाप्रति प्रेम असणाऱया मसणजोगी समाजातील लक्ष्मण राजाराम घनसरवाड यांची कन्या अनुराधा हिने अनेकदा जळत्या चितेसमोर अभ्यास करत आपले बीएससी कॉम्प्युटरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिची शिक्षणाची गोडी आणि जिद्द पाहून पुणे येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेले व सध्या तहसीलदारपदी पदोन्नती झालेले सांगोला येथील संजय खडतरे यांनी अनुराधास दत्तक घेऊन इयत्ता बारावीपासून बीएससी कॉम्प्यूटरपर्यंतचा तिचा शिक्षणाचा खर्च केला. तसेच रविवार, 14 मे रोजी तिचे मंगळवेढा येथील सुभाष उपेवाड यांचे चिरंजीव शिवराज याच्याशी मोठय़ा थाटात विवाह लावून दिला.
तहसीलदार संजय खडतरे यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या विवाहसोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

























































