भंगारातून गोळा केलेल्या बाटल्यांमधूनन बनावट दारूची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पिरीट व ब्लिचिंग पावरडचा वापर करून बनावट दारू बनविणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून मुद्देमालही जप्त केला आहे. विक्की राजेश जयस्वाल, देवानंद सोनबाजी आडे आणि विशाल राजेश जयस्वाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे तिघे डिनेचर स्पिरीट व ब्लिचिंग पावडरचा वापर करून बनावट देशी दारू बनवत होते. घटना स्थळावरून पोलिसांनी 90 मिलीच्या 60 बॉटल व 180 मिलीच्या 18 बॉटल जप्त केल्या आहेत. बनावट दारू तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेसह बॉटलवर लेबल असलेल्या दारू निर्माण करणाऱ्या कंपनीकडे पाठविण्यात येणार आहे.

आरोपी दारू घरीच बनवत होते. ही दारू भंगारातून विकत आणलेल्या 90 मिली व 180 मिलीच्या बॉटलमध्ये दारू भरली जायची. शंका येऊ नये, यासाठी बॉटलला कंपनी लावते तसेच बूच लावले जायचे. ही दारू कमी किंमतीत विकली जात असल्याने तिची मागणी वाढली होती. दारू बनविण्यासाठी आरोपी स्पिरीट कुठून विकत आणायचे याचा सध्या शोध घेतला जात आहे. बनावट दारूसंदर्भात नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितेश शेंडे यांनी केले आहे . या कारवाईमध्ये भरारी पथकाचे निरीक्षक एस. एन. भटकर, डी.एच. त्रिपाठी, डि.ओ. कुटेमाटे, पी. आर. बाभूळकर, ए. बी. पेंदोर, ए.ए. पठाण, एस. एस. दुधे, एम. आर. खोब्रागडे, पी. जी. मसराम, अजय देशमुख, संजय राठोड, सी. डी. चिद्दरवार, सी. जी. नागुलवाड आदी सहभागी झाले होते.