
शिवसेना महिला आघाडीच्या पहिल्या अध्यक्षा, माजी नगरसेविका ऍड. सुधा चुरी यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ऐंशी- नव्वदच्या दशकात मुंबई गाजविणारे महिला नेतृत्वाचे एक पर्व संपले, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ऍड. सुधा चुरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसैनिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या सुरुवातीपासून ऍड. सुधा चुरी या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असायच्या. गोरेगाव हे खरोखरच गाव असताना शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कामाची सुरुवात करून त्यांनी जनतेच्या मनात स्थान मिळवले होते. शिवसेनेतील उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या उच्च शिक्षण आणि सामाजिक कार्यामुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचा अभिमानाने ‘ही आमची सावित्रीबाई फुले’ असा उल्लेख करायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या अतिशय विश्वासू नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. रमाधाम वृद्धाश्रमाचे विश्वस्त म्हणूनदेखील ऍड. सुधा चुरी यांनी काम पाहिले होते.




























































